300 वर्षांच्या परंपरेला बसली खीळ
By Admin | Published: August 24, 2014 11:18 PM2014-08-24T23:18:40+5:302014-08-24T23:53:30+5:30
दगडू सोमाणी, गंगाखेड येथील वैष्णव घाटाला गटाराच्या दलदलीने घेरल्याने शेकडो वर्षांपासूनच्या चालत आलेल्या परंपरेला खीळ बसत आहे़
दगडू सोमाणी, गंगाखेड
शहरालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीतील दशक्रिया व अन्य विधी करण्यासाठी येथील वैष्णव घाटाला पौराणिक व धार्मिक महत्त्व आहे़ मात्र या घाटाला गटाराच्या दलदलीने घेरल्याने शेकडो वर्षांपासूनच्या चालत आलेल्या परंपरेला खीळ बसत आहे़
महाराष्ट्रात नाशिकनंतर गंगाखेड येथील गोदावरी नदीच्या वैष्णव घाटावर दशक्रिया, नारायण नागबळी, पितृदोष व कालसर्प शांती आदी विधी उरकण्यासाठी महत्त्व आहे़ गंगाखेड येथील गोदावरी नदी नभी स्थान असल्यामुळे हे सर्व विधी या ठिकाणी पार पडतात़ चालू पावसाळी हंगामात पाऊस न झाल्याने गोदावरी पात्रात पाणी आले नाही़ त्यामुळे दशक्रिया विधी उरकरण्यासाठी पुरोहित व बाहेरगावाहून येणाऱ्या कुटूंबांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो़
३०० वर्षांपूर्वी येथील गोदावरी पात्रात दशक्रियेसह अन्य विधी उरकता यावेत, म्हणून अहिल्याबाई होळकरांनी वैष्णव घाटाची निर्मिती केली़ तर संस्थानिक राजे रघुत्तम राजे यांनी विधी उरकण्यासाठी ओवऱ्याची निर्मिती केली़ मागील ३५० वर्षांपासून गोदावरी नदीच्या वैष्णव घाटावर दशक्रिया विधीसह अन्य विधी उरकण्यासाठी बीदर, गुलबर्गा, हैदराबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड व परभणी जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी येतात़ दररोज या घाटावर ५० ते १०० व्यक्तींचे कुटुंब दशक्रिया विधी करण्यासाठी या ठिकाणी येतात़ हा विधी पार पाडण्यासाठी गोदावरी नदीचे स्रान करावे लागते़ त्यानंतर ओल्या कपड्याने तीन-चार तासांत हा विधी पूर्ण केला जातो़ शहरातील येणारे गटाराचे पाणी आज या घाटावर थांबत आहे़ यामुळे घाण पाण्याचा विधीसाठी येणारे नागरिक नाईलाजाने स्रानासाठी वापर करतात़ मागील वर्षी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन या घाटाची सफाई मोहीम राबविली़ त्यामुळे घाट स्वच्छ झाला़ मात्र स्वच्छ घाटात घाण व दूषित पाण्याने बस्तान मांडले आहे़ वास्तविक पाहता गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्यात हा विधी उरकावा असे धर्मशास्त्राप्रमाणे म्हटले जाते़ गंगाखेड येथील गोदावरी नदीच्या घाटाला धार्मिक व पौराणिक महत्त्व असताना केवळ दूषित पाण्याअभावी या विधी कार्याचे महत्त्व कमी होत आहे़ नदीत शहरातील येणारे सांडपाणी इतरत्र वळवावे व शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या विधी, परंपरा या घाटावर चालू रहाव्यात, अशी मागणी होत आहे़
प्रयागतीर्थ झऱ्याने तारले
गोदावरी पात्रात मागील तीन- वर्षांत वाहते पाणी बंद झाले व वैष्णव घाटावर घाण पाणी असताना या ठिकाणी साचलेल्या प्रयाग तीर्थ पाण्याच्या झऱ्यामुळे दशक्रियेसह अन्य विधी उरकण्यासाठी मोठी मदत झाली़ आज केवळ या झऱ्यामुळे या ठिकाणचे विधी पार पडतात व विधी कार्यक्रम पुढे चालू आहेत़ केवळ एक प्रयागतीर्थ झरा दररोज शेकडो कुटुंबियास विधी पार पाडण्यासाठी मदत करतो़
कपडे व जनावरे धुतात
गोदावरी पात्रात शहरातील सांडपाण्यामुळे येथील पाणी दूषित झाले असून, याच घाटावर शहरातील नागरिक कपडे धुतात़ तर काही व्यक्ती जनावरे देखील याच ठिकाणी पाण्यात धुतली जातात़ या दूषित पाण्यामुळे रोगराई होण्याची शक्यता असतानाही महिला मंडळींना या घाटावर कपडे धुण्याचा मोह आवरत नाही़
दूषित पाण्यामुळे पित्रपुरोहितांच्या व्यवसायावर पाणी
गोदावरीच्या वैष्णव घाटावर दशक्रिया विधी उरकण्यासाठी दररोज या ठिकाणी ५० पित्रपुरोहित (वैदिक ब्राह्मण) उपस्थित असतात़ या विधीमुळे जवळपास १०० ते १५० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो़ वर्षातील काही महिने व वर्ष ही कुटुंब आपसात वाटून घेतात़ दशक्रिया विधीतून पित्रपुरोहित कुटुंबाची रोटीरोजी निर्माण होते़ मात्र घाटावर वाहते पाणी रहात नसल्यामुळे गंगाखेड घाटावरील विधीचे महत्त्व कमी होत असून, बाहेरगावाहून येणाऱ्या कुटुंबांची संख्या रोडावत आहे. परिणामी पित्रपुरोहितांच्या व्यवसायावर पाणी फिरत असल्याची प्रतिक्रिया तीर्थक्षेत्र पुरोहित बंडूदेव जोशी यांनी दिली़
विधीसाठी याठिकाणी स्रानाची, राहण्याची व स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने तसेच दूषित पाण्यामुळे गंगाखेडच्या गोदावरी नदीवर येण्यापेक्षा नाशिककडे जाण्याचा कल वाढला आहे़
४गंगाखेडपासून ३ किमी अंतरावर गोदावरी पात्रात मुळी येथे बंधारा उभारण्यात आला़ त्यामुळे वाहते पाणी चार वर्षांपासून बंद आहे़ यानंतर गंगाखेडपासून ३० किमी अंतरावर डिग्रस बंधारा झाला़ बंधारा उभारल्यानंतर गंगाखेडच्या गोदावरी नदी पात्रात ५ ते ६ फुट पाणी राहणार असे केंद्रीय जल आयोगाने जाहीर केले होते़ मात्र तेही पाणी गोदावरीच्या वैष्णव घाटाजवळ आले नाही़