‘बाटू’ देणार अभियांत्रिकीमध्ये मेजर व मायनर पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 02:02 PM2019-12-16T14:02:29+5:302019-12-16T14:08:58+5:30
आगामी वर्षापासून होणार लागू
- राम शिनगारे
औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (बाटू) अधिसभेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अभियांत्रिकीतील इलेक्ट्रॉनिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल आणि संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमात अतिरिक्त २० क्रेडिट प्राप्त केले असतील तर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिकमध्ये मेजर आणि संगणकामध्ये मायनर पदवी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘बाटू’ विद्यापीठाच्या विद्यापरिषदेची बैठक नुकतीच लोणेरे येथे पार पडली. या बैठकीत आगामी शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यात महत्त्वाचा बदल म्हणजे ‘बाटू’ विद्यापीठ आगामी वर्षांपासून मेजर आणि मायनर पदवी प्रदान करणार आहे. दोन्ही अभ्यासक्रमांची पदवी एकच असणार असून, त्यामध्ये दोन्हींचा उल्लेख राहणार आहे. विद्यापरिषदेच्या बैठकीत अधिकच्या क्रेडिटचे असणारे अभ्यासक्रम कमी करण्यात आले आहेत. आता नव्या नियमानुसार आगामी शैक्षणिक वर्षापासून १६० क्रेडिट आणि ८ सीजीपीएचा अभ्यासक्र म पाच सत्रांमध्ये असणार आहे. यात शेवटच्या सत्रांमध्ये पूर्णपणे प्रात्यक्षिक राहणार आहे. यासाठी ४० क्रेडिट देण्यात येतील. यासाठी विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करावी लागेल.
तसेच विद्यार्थ्यांना मेजर आणि मायनर पदवी हवी असेल तर अतिरिक्त २० क्रेडिटचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. यात संगणक विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिकसह इतर प्रत्येक विषयात २० क्रेडिट पूर्ण केल्यास त्या अभ्यासक्रमाची मायनर पदवी प्राप्त होणार आहे. तर मूळ प्रवेश असलेल्या विषयाचीच मेजर पदवी असेल. याचा फायदा विद्यार्थ्यांना नोकरीला अर्ज केल्यानंतर होणार आहे. तंत्रज्ञानाच्या, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान असल्याचे यातून स्पष्ट होणार असल्याचेही विद्यापीठाच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले. यात विशेष म्हणजे मायनर पदवीसाठी अतिरिक्त अभ्यासक्रम करायचा की नाही, याविषयीचा निर्णय विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन असणार नाही, हे विशेष.
याविषयी बोलताना देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर म्हणाले, या नव्या अभ्यासक्रमांचा आणि पदवीचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करण्यासाठी मायनर पदवी महत्त्वाची असेल. विद्यार्थ्यांकडे सर्वव्यापी ज्ञान असल्याचे यातून स्पष्ट होणार आहे.
४० महाविद्यालयांचे अकॅडमिक आॅडिट
‘बाटू’च्या विद्यापरिषद बैठकीत अकॅडमिक आॅडिटविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये विद्यापीठ प्रत्येक संलग्न महाविद्यालयाचे अकॅडमिक आॅडिट करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाटू विद्यापीठाशी संलग्न असलेल्या औरंगाबादेतील बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी अकॅडमिक आॅडिट केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर यांनी दिली.
औरंगाबादेत विभागीय केंद्रासाठी जागेची पाहणी
बाटू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदाला रामशास्त्री यांनी औरंगाबादेत विभागीय केंद्र सुरू करण्यासाठी नुकतीच भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. रामशास्त्री यांनी महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाला देण्यात आलेल्या जागेपैकी दोन एकर जागा मागण्याचा निर्णय घेतला आहे. यास विधि विद्यापीठाची मान्यता मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. याशिवाय डॉ. रामशास्त्री यांनी सीएसएमएसएस संस्थेची पाहणीही यावेळी करीत तात्पुरते केंद्र या संस्थेच्या जागेत करण्याविषयी संस्थाचालकांशी चर्चा केल्याचे समजते.