समाजकल्याणच्या बैठकीला बीडीओंची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:13 AM2017-09-02T00:13:17+5:302017-09-02T00:13:17+5:30
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या बैठकीला १६ पैकी १४ तालुक्यांतील बीडीओंनी दांडी मारल्यामुळे समाजकल्याण सभापती शीला निखाते यांनी नाराजी दर्शवित गैरहजर असलेल्या बीडीओंचा खुलासा मागविण्यात यावा, अशी सूचना प्रशासनाला दिल्या़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या बैठकीला १६ पैकी १४ तालुक्यांतील बीडीओंनी दांडी मारल्यामुळे समाजकल्याण सभापती शीला निखाते यांनी नाराजी दर्शवित गैरहजर असलेल्या बीडीओंचा खुलासा मागविण्यात यावा, अशी सूचना प्रशासनाला दिल्या़
जि़ प़ समाजकल्याण सभापती शीला निखाते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ दलित वस्तीच्या सुधारित आराखड्यासंदर्भात १६ तालुक्यांतील गटविकास अधिकाºयांना सभेला हजर राहण्याचे कळविण्यात आले होते़ परंतु या सभेला धर्माबाद व लोहा तालुक्यातील गटविकास अधिकाºयांचीच उपस्थिती होती़ त्यामुळे दलित वस्तीच्या आराखड्याचा विषय प्रलंबित ठेवावा लागला़
त्यामुळे सभापती निखाते यांनी संबंधित अधिकाºयांच्या गैरहजरीमुळे नाराजी दर्शवली़ महत्त्वाच्या विषयावर आयोजित केलेल्या बैठकीचे कोणतेही गांभिर्य अधिकाºयांना नसल्यामुळे विषयपत्रिकेतील कामे कधी मार्गी लागणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़ सभेला गैरहजर असलेल्या १४ गटविकास अधिकाºयांचे खुलासे मागविण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र देण्यात आले आहे़
दरम्यान, जि. प. च्या दलित वस्तीच्या २२ कोटींच्या कामांचे हे प्रकरण थंडबसत्यात अडकल्याने गत तीन- चार महिन्यांत कोणताच निर्णय झाला नाही़ त्यामुळे नवीन जि़प़ सदस्य संभ्रमात होते़ दलित वस्तीतील सिमेंट रस्ते, नाली, पाणी पुरवठ्याचे कामे, सौरदिवे, समाजमंदिर आदी कामे प्रस्तावित आहेत़ जि़ प़ समाजकल्याण सभापती निखाते यांनी समिती सदस्यांच्या संमतीने नवीन प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानंतर विभागीय आयुक्तांनीही त्यास अनुकूलता दर्शविली होती़, परंतु नुकताच राज्य शासनाने या निर्णयाला ब्रेक लावला होता़ त्यामुळे सदस्यांचा हिरमोड झाला़ परंतु २०१८ ते २०२३ या पाच वर्षांच्या दलितवस्ती आराखड्यास डिसेंबरमध्ये मंजुरी मिळणार आहे़
त्यासाठी पहिल्या वर्षात ४० कोटींचा निधी प्राप्त होणार आहे़ ग्रामपंचायत स्तरावर दलित वस्तीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत़