काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात सर्दी-खोकला, तापाचे सर्वाधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 07:44 PM2024-08-20T19:44:09+5:302024-08-20T19:44:22+5:30
मनपाच्या ४० आरोग्य केंद्रांवर दररोज २ हजार रुग्ण
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या ४० आरोग्य केंद्रांवर दररोज दोन हजारांहून अधिक रुग्ण येत आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण सर्दी-खोकला आणि तापाचे आहेत. काही आरोग्य केंद्रांवर सकाळी लांबलचक रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका महिन्यात सर्व आरोग्य केंद्रांवर येणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास ३० हजारांपर्यंत जात आहे.
शहरात महापालिकेचे पाच रुग्णालये, ४० आरोग्य केंद्र आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक प्रमाणात औषधी उपलब्ध करून दिली जात आहेत. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला बहुतांश औषधी आरोग्य केंद्रातच देण्यात येतात. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी अर्चाना राणे यांनी सांगितले. ४० आरोग्य केंद्रात १४ ऑगस्ट रोजी २ हजार १८६ रुग्णांची नोंद झाली.
सर्वाधिक रुग्ण एन- ७ येथील आरोग्य केंद्रात
सर्वाधिक ओपीडी सिडको एन- ७ येथील आरोग्य केंद्रात होती. या ठिकाणी १७७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्या खालोखाल १६० रुग्णांची तपासणी सिडको एन-११ येथील आरोग्य केंद्रात झाली. बायजीपुरा येथील आरोग्य केंद्रात १३६ रुग्णांची तर सादातनगर आरोग्य केंद्रात १०५ रुग्णांची ओपीडी झाल्याची नोंद आहे. जुलै महिन्यात सर्व आरोग्य केंद्रात मिळून २९ हजार ५२१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. बहुतेक रुग्ण सर्दी, खोकला, ताप या आजाराचे होते.