काळजी घ्या! राज्यातील सर्वाधिक डेंग्यू रुग्णांच्या शहरात छत्रपती संभाजीनगर
By संतोष हिरेमठ | Published: July 12, 2023 08:20 PM2023-07-12T20:20:24+5:302023-07-12T20:21:06+5:30
डेंग्यूचा डंख, आरोग्य जपा; पावसाळ्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
छत्रपती संभाजीनगर : राज्यात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण असलेल्या राज्यातील ६ शहरांमध्ये (महापालिका) छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा समावेश झाला आहे. जानेवारी ते जूनदरम्यानच्या रुग्णसंख्येवरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सर्वाधिक रुग्ण हे जून महिन्यात आढळले असून, जुलै महिन्यातही डेंग्यू हातपाय पसरवत आहे.
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा म्हणाले, शहरात डेंग्यूची रुग्णसंख्या ही कमी आहे. आतापर्यंत २३ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू नियंत्रणासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. बाहेरील काही रुग्णांनी घाटीत उपचार घेतला. त्यांचा पत्ता नमूद नाही. त्यामुळे शहराच्या रुग्णांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले म्हणाले, जुलै महिन्यात आतापर्यंत १० डेंग्यू रुग्णांचे निदान झाले आहे. यातील काहींचा पत्ता स्पष्ट झालेला नाही.
सर्वाधिक डेंग्यू रुग्ण असलेल्या महापालिका
महापालिका - रुग्णसंख्या (जानेवारी ते जून)
मुंबई : ६२६
नाशिक : ११६
सांगली मिरज : ८४
सोलापूर : ४५
कोल्हापूर : ४०
छत्रपती संभाजीनगर : ३१
औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या (जानेवारी ते जून)
महिना-ग्रामीण -शहर
जानेवारी- ११-७
फेब्रुवारी-४-३
मार्च-०-०
एप्रिल-०-०
मे-२-४
जून-९-१७
एकूण-२६-३१
-------
जिल्ह्यात जूनमध्ये किती घऱांमध्ये आढळली डास अळी - २ हजार ७७६