सावधान! कोरोनाप्रमाणे डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:02 AM2021-09-24T04:02:02+5:302021-09-24T04:02:02+5:30
रुग्णसंख्येत रोज भर : आरोग्य यंत्रणेसह नागरिकांवर दुहेरी संकट - संतोष हिरेमठ औरंगाबाद : गेल्या १७ महिन्यांपासून नागरिकांना कोरोनाच्या ...
रुग्णसंख्येत रोज भर : आरोग्य यंत्रणेसह नागरिकांवर दुहेरी संकट
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : गेल्या १७ महिन्यांपासून नागरिकांना कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाचा विषाणू स्वत:मध्ये वारंवार बदल करत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखणे कठीण होत आहे. या सगळ्यात जिल्ह्यात डेंग्यूनेही डोके वर काढले असून, कोरोनाप्रमाणे डेंग्यूचाही व्हायरस बदलत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
डेंग्यू हा डासांपासून पसरणारा विषाणूजन्य गंभीर आजार आहे. डी- १, डी- २, डी- ३ व डी- ४ या चार डेंग्यू विषाणूंपासून डेंग्यू ताप (डी. एफ.) व डेंग्यू रक्तस्त्रावी ताप (डी.एच.एफ.) उद्भवतो. त्यांचे सर्वसाधारण गुणधर्म सारखेच असतात. गेल्या ८ महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची सर्वाधिक वाढ झाली. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच डेंग्यूची लागण होत आहे.
डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागे दुखणे, ही काही लक्षणे आहेत. रक्तस्त्रावीत डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे आहेत.
--------
डेंग्यूचे रुग्ण
जानेवारी ते २२ सप्टेंबरदरम्यान शासकीय यंत्रणेतील नोंदीनुसार (निश्चित डेंग्यू) १०४ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच खासगी रुग्णालयात निदान झालेल्या डेंग्यू रुग्णांची संख्या १११ आहे. यानुसार जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत डेंग्यूचे २१५ रुग्ण आढळले आहेत.
-----
आतापर्यंत २६० टेस्ट
डेंग्यूसंदर्भात आतापर्यंत २६० टेस्ट करण्यात आल्या आहेत. यात १०४ जण डेंग्यू पाॅझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली. डेंग्यूचा उद्रेक झालेल्या २०१९मध्ये एकूण १ हजार ३२ टेस्ट झाल्या होत्या.
---------
हे बदल काळजी वाढविणारे
लक्षणे डेंग्यूची, पण अहवाल निगेटिव्ह
अनेक रुग्णांमध्ये डेंग्यूसारखीच लक्षणे दिसून येत आहेत. परंतु त्यांचा तपासणीचा अहवाल डेंग्यू निगेटिव्ह येत आहे. प्लेटलेट कमी होणे, खूप ताप येणे, रॅशेस, थंडी वाजून येणे, असा त्रास जाणवतो. डी-१ ते डी-४ असे डेंग्यूचे चार प्रकार आहेत.
- डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी
---
इलायझा चाचणीने निदान
सध्या व्हायरल फिव्हरची साथ सुरु आहे. इलायझा या चाचणीद्वारे डेंग्यूचे निदान होते. एनएस - १ अँटिजन आढळून आल्यास डेंग्यू पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होते. रॅपिड टेस्ट ही कोणत्याही व्हायरल फिव्हरमध्ये पाॅझिटिव्ह येण्याची शक्यता असते.
- डाॅ. प्रमोद सरवदे, पॅथोलाॅजिस्ट
--
डेंग्यूचे चार प्रकार
डी-१ ते डी-४ असे डेंग्यू विषाणूचे चार प्रकार आहेत. सर्वांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. रुग्णांनी कोणताही ताप अंगावर काढता कामा नये. डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
- रवींद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी