सावधान ! कोरोना, ओमायक्राॅनसोबत चिकुनगुनियाचेही रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 03:55 PM2022-01-11T15:55:12+5:302022-01-11T15:55:39+5:30
डासांचा प्रादुर्भाव नियंत्रणाकडे दुर्लक्ष केले, तर आजाराचा ‘डंख’
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना, ओमायक्राॅनमुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या नव्या संकटाचा मुकाबला करताना डेंग्यू, चिकुनगुनियासह इतर आजारांचे आव्हानही आरोग्य यंत्रणेसमोर कायम आहे. जिल्ह्यात सध्या चिकुनगुनियाचे रुग्ण आढळणे सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यानंतर सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली होती. मोठ्या व्यक्तींबरोबर लहान मुलांनाही डेंग्यूचा विळखा पडला. डेंग्यूच्या एकूण रुग्णांमध्ये ३० टक्के बालरुग्णांचा समावेश राहिला. त्यानंतर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली; परंतु रुग्ण आढळणे पूर्णपणे बंद झालेले नाही. चिकुनगुनियाचेही रुग्ण सापडत आहे. जानेवारीत आतापर्यंत शहरात चिकुनगुनियाचे ३ रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली. डेंग्यू, चिकुनगुनियाच्या तुलनेत मलेरियाचे रुग्ण नसल्याचीच परिस्थिती आहे. गतवर्षी केवळ एक रुग्ण आढळला. मात्र, डेंग्यू आणि चिकुनगुनियावर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान अजूनही कायम आहे.
घ्यावयाची काळजी...
- डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागे दुखणे, ही काही लक्षणे आहेत.
- चिकुनगुनिया हा आजार डेंग्यू पसरविणाऱ्या एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. या रोगाची लक्षणेही अनेकदा डेंग्यूसारखीच असतात. कोणतीही लक्षणे असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- घराच्या परिसरात कुठेही पाणी साचू देता कामा नये. पाण्याच्या टाक्यांना झाकण लावलेले असावे. घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. डास प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करावा.
तुरळक रुग्ण
डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण हे वर्षभर तुरळक प्रमाणात आढळत असतात. पावसाळ्यात रुग्णसंख्या ही काही प्रमाणात वाढते. सध्याही तुरळक रुग्ण आहे. त्यामुळे चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही.
- रवींद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी
जिल्ह्यातील रुग्णांची स्थिती
महिना-डेंग्यू-चिकुनगुनिया
सप्टेंबर २०२१ -८०-४
ऑक्टोबर २०२१-२-०
नोव्हेंबर २०२१-४-०
डिसेंबर २०२१-४-२
जानेवारी २०२२-०-३