काळजी घ्या, डोळे येण्यासह ‘डेंग्यू’चा ताप वाढला
By संतोष हिरेमठ | Published: August 11, 2023 03:32 PM2023-08-11T15:32:25+5:302023-08-11T15:32:52+5:30
जून, जुलैपाठोपाठ ऑगस्ट महिन्यातही जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांचे निदान होत आहे.
छत्रपती संभाजीनगर : डोळे येण्यासह डेंग्यूच्या साथीचेही संकट आरोग्य यंत्रणेपुढे उभे राहिले आहे. जून, जुलैपाठोपाठ ऑगस्ट महिन्यातही जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांचे निदान होत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातच रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे. डेंग्यूच्या तापापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
याकडे करू नका दुर्लक्ष
- ताप. डेंग्यूचे हे सर्वांत सामान्य लक्षण आहे.
- उलट्या, मळमळ, वेदना, पुरळ.
- गंभीर लक्षणांमध्ये पोट दुखणे, उलट्या होणे, हिरड्या आणि नाकातून रक्त येणे.
- थकवा, अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे.
ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत किती रुग्ण ?
ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत डेंग्यूच्या ७ रुग्णांचे निदान झाले आहे. यात कन्नड येथे २, पैठण येथे ४ आणि सिल्लोड येथे एका रुग्णाचे निदान झाले. सुदैवाने शहरात या महिन्यात आतापर्यंत एकही डेंग्यू रुग्ण आढळून आला नाही.
साथ नाही, तुरळक रुग्ण
जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या काहीशी वाढली होती. मात्र, सध्या जिल्ह्यात डेंग्यूची साथ नाही. तुरळक रुग्ण आहेत.
- रवींद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी
जुलै महिन्यात कुठे किती डेंग्यू रुग्ण?
तालुका ----रुग्ण
औरंगाबाद-५
फुलंब्री-३
गंगापूर-२
कन्नड-२
खुलताबाद-८
पैठण-१
सिल्लोड-५
वैजापूर-१
छत्रपती संभाजीनगर शहर (मनपा) १४
एकूण-४१