सावधान ! येथे धोका आहे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2017 12:36 AM2017-06-03T00:36:56+5:302017-06-03T00:37:23+5:30
बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. सोलापूर-धुळे (२११) या राष्ट्रीय महामार्गावरून जात असाल तर सावधान!
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पावसाळा तोंडावर आला आहे. सोलापूर-धुळे (२११) या राष्ट्रीय महामार्गावरून जात असाल तर सावधान! बिंदुसरा नदीवरील असणाऱ्या पुलावर धोका आहे. कारण, हा पूल धोकादायक आहे, तर पर्यायी पूल कमी उंचीचा असल्याने येथे अपघाताची दाट शक्यता आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधीही अनभिज्ञ आहेत. दरम्यान, याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसणार, हे निश्चित.
उत्तर व दक्षिण भारताला जोडण्यासाठी अगदी कमी अंतरात सोयीचा असणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावरुन दररोज २० हजारांवर वाहने ये-जा करतात. याच महामार्गावर शहरातून जाणारी बिंदुसरा नदी आहे. या नदीवरील पूल १९३८ साली ब्रिटिशांनी बांधला होता. सुरुवातीला या पुलाची रुंदी ५.५ मीटर एवढी होती. १९८८ मध्ये या पुलाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यात दोन्ही बाजूंनी ४ गर्डर नव्याने बांधण्यात आले. त्यामुळे या पुलाची रुंदी ७.५ मीटर झाली. हा पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय ४ मे २०११ रोजी झाला होता; मात्र प्रत्यक्षात जून २०१४ मध्ये त्याची अंमलबजावणी झाली.
तेव्हापासून आजपर्यंत या पुलाची केवळ डागडुजी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींना अपयश आले. गतवर्षी महाडच्या सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. आयआरबीच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ८ आॅगस्ट २०१६ रोजी याची पाहणी केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या उच्चस्तरीय गुणवत्ता तपासणी पथकाने या पुलाची पाहणी केली.
यामध्ये हा पूल वापरण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या पुलावरून अवजड वाहनांसाठी होणारी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे सोलापूरकडे जाणारी अवजड वाहने पाटोदामार्गे वळविण्यात आली. याचा फटका म्हणजे त्यांना ९० किलोमीटर अंतर जास्त कापावे लागले. यामध्ये त्यांना इंधनाचा अधिकचा भुर्दंड व वेळ खर्ची करावा लागला होता. वाहनधारकांच्या या त्रासाची कुणीही दखल घेतली नाही, हे विशेष.
कमी उंचीमुळे पर्यायी पूलही धोकादायक !
गतवर्षी झालेल्या पावसात बिंदुसरा नदीला पूर आल्याने ब्रिटिशकालीन पुलावरूनही पाणी वाहले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यातच हा पूल वापरण्यास अयोग्य असल्याने तो यावर्षी बंद करण्यात आला. त्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून बाजूने केलेल्या रस्त्याची उंची अतिशय कमी असल्याने याला पावसाळ्या धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे.