सावध रहा, भेसळ केलेले पनीर कसे ओळखाल?
By साहेबराव हिवराळे | Published: August 18, 2023 08:34 PM2023-08-18T20:34:33+5:302023-08-18T20:35:05+5:30
पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थांची योग्य तापमानात साठवणूक करावी, तसेच काही अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही संशय आल्यास प्रशासनाकडे संपर्क साधावा.
छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात पनीर, चक्का दही, खवा यासारख्या दुग्धजन्य पदार्थांची बाजारपेठेत ग्राहकांकडून मागणी वाढते. मागणी वाढल्याने अशा अन्नपदार्थांचा तुटवडा होऊ शकतो. अशा वेळी कमी दर्जाचे अथवा भेसळयुक्त पदार्थ विक्री होऊ शकतात. ग्राहकांनी सजग राहून दुग्धजन्य पदार्थांची खरेदी करणे आवश्यक असते. पनीर नैसर्गिक पद्धतीने दुधापासून बनवितात; परंतु काही जण त्यामध्ये खाद्यतेल, युरिया पावडर यासारखे पदार्थ वापरून कमी दर्जाचे पनीर बनवून विक्री करतात.
या पद्धतीने ओरिजनल आणि नकली पनीर ओळखू शकता
सर्वप्रथम पनीर घेताना पनीरचा तुकडा क्रश करावा लागेल. जर पनीर रगडल्याने फुटू लागले तर ते नकली आहे हे लक्षात आले पाहिजे.
सातत्याने विभागातील कर्मचारी तपासणी करतात..
ओरिजनल पनीरचा दुधासारखा वास येतो, तर नकली पनीरला वास नसतो किंवा आंबट वास येतो. त्यात काही तफावत आढळून आल्यास दंडात्मक कारवाईही होते.
पनीरमधील भेसळ कशी ओळखाल?
बनावट पनीरमध्ये स्किम्ड मिल्क पावडर घातलेली असते. त्यामुळे अशा पनीरला जास्त दबाव पेलता येत नाही आणि त्याचे बारीक तुकडे होत जातात. अस्सल पनीरचा तुकडा दाबल्यानंतर रबरासारखा दाबला जातो, त्याचे बारीक बारीक तुकडे होत नाहीत.
काय होणार कारवाई?
अन्न व औषधी प्रशासनातर्फे सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या दुकानांची विशेष तपासणी करण्यात येते. संशय आढळून आल्यास अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात येतात. विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. विश्लेषण अहवालानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. न्यायालयात दोषींवर खटला दाखल करण्यात येतो.
संशय आल्यास प्रशासनाकडे संपर्क साधावा...
पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थांची योग्य तापमानात साठवणूक करावी, तसेच काही अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही संशय आल्यास प्रशासनाकडे संपर्क साधावा. परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच अन्नपदार्थांची खरेदी करावी.
- निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी