नशेची औषधे मुलांना विकाल तर खबरदार ! सीसीटीव्ही लावण्याकडे मेडिकल चालकांचे दुर्लक्ष
By साहेबराव हिवराळे | Published: July 15, 2023 07:11 PM2023-07-15T19:11:56+5:302023-07-15T19:14:03+5:30
सीसीटीव्ही नसल्याने दुकानात कोण आला आणि कोण औषधे घेऊन गेला हे पथकाला समजत नाही
छत्रपती संभाजीनगर : नशेच्या औषधांची विक्री थांबविण्यासाठी राज्य शासनाने औषध विक्री दुकानांना किमान दोन सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. मोठे दुकानदार सोडले तर किरकोळ विक्रेत्यांना हा महागडा खर्च पेलवत नाही, असे म्हटले जाते. परंतु, सीसीटीव्ही नसल्याने दुकानात कोण आला आणि कोण औषधे घेऊन गेला हे पथकाला समजत नाही किंवा त्याचा थांगपत्ताही लागत नाही. परंतु, नियमित तपासणी व रेड टाकण्यासाठी अनेक बाबींवर लक्ष ठेवणे पथकांना गरजेचे असून, लहान मुलांना नशेच्या गोळ्या घेण्यापासून वाचवू शकतो, असा उद्देश असला तरी बहुतांश औषध दुकानांनी सीसीटीव्ही बसविलेले दिसत नाहीत.
नशेच्या औषधांवरील नियंत्रणासाठी सीसीटीव्हीची सक्ती...
नशेच्या औषधांच्या विक्रीसाठी बंदी असून, वैद्यकीय प्रीस्क्रिप्शन दिल्याशिवाय नशेच्या गोळ्या कुणी दिल्यास त्याच्यावर एफडी तसेच मेडिकल असोसिएशन कडक कारवाई करण्याच्या भूमिकेत आहेत. त्यासाठी सीसाीटीव्ही बसविणे गरजेचे आहे.
दोन सीसीटीव्ही हवेच
दुकानात दिवसभरात कोणत्या व्यक्तीने किती व कोणत्या प्रकारची औषधे नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. किमान दोन सीसीटीव्ही दुकानदाराकडे असावेच. त्याच्याही ते फायद्याचे आहे.
काही औषधांचा नशेसाठी वापर
बटण गोळ्या व व्हाइटनर, पंक्चर काढण्यासाठी लागणारे सोल्युशन, खोकल्याचे औषध, वेदनाक्षम औषधे यांचा काही जण नशेसाठी वापर करतात.
तर मेडिकल्सवर कारवाई
लहान मुलांना नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दुकानावर व त्या व्यावसायिकावर कडक कारवाई करण्यात येते. दुकानदाराचे सभासदत्वही मेडिकल असोसिएशन रद्द करणार आहे.
छोट्या दुकानांना सीसीटीव्ही कसा परवडेल?
छोट्या दुकानाला सीसीटीव्ही कसा परवडेल, असे असोसिएशन व मेडिकल चालकांचेही म्हणणे आहे.
अनेक मेडिकल्समध्ये सीसीटीव्हीच नाही
अनेक किरकोळ मेडिकलमध्ये सीसीटीव्हीच बसविलेले नाहीत. नशेच्या गोळ्या विकत नाही तर सीसीटीव्ही बसविण्याची आवश्यकता नाही, असेही दुकानदार सांगतात.
कुणी स्वत:च्या पोटावर कशाला मारून घेईल...
शक्यतो कुणीही नशेच्या गोळ्या विकत नाहीत. दोषींवर प्रशासन कारवाई करणार आहे. दुकानाचा परवाना व सदस्यत्व रद्द होईल.
- विनोद लोहाडे, सचिव, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन
पथक तयारच आहे...
जेथेही गोळ्यांची स्ट्रीप पकडली व कंपनीला पथक पाठविले की तो स्टॉक आम्ही मराठवाडासाठी दिलेला नाही, असे उत्तर येते. कारवाईसाठी पथक तयार आहे.
- शाम साळे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी