सावधान; अकरावी प्रवेशासाठीच्या ऑनलाईन नोंदणीत होतेय हेराफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 08:08 PM2018-06-21T20:08:01+5:302018-06-21T20:08:37+5:30
नोंदणी करताना पालक, विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत हवे असलेल्या महाविद्यालयांमध्ये नोंदणी करण्याऐवजी दुसऱ्याच महाविद्यालयाचे नाव विकल्पामध्ये टाकण्यात येते.
औरंगाबाद : अकरावीत प्रवेश घेण्यासाठी शाळा, झोन असलेल्या महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. ही नोंदणी करताना पालक, विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत हवे असलेल्या महाविद्यालयांमध्ये नोंदणी करण्याऐवजी दुसऱ्याच महाविद्यालयाचे नाव विकल्पामध्ये टाकण्यात येते. याचवेळी अनुदानित जागेवर पहिला हक्क असतानाही विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित जागांची नोंदणी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. याविषयी सजग राहण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी केले.
अकरावीच्या प्रवेशाची नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण झालेल्या महाविद्यालयातून नोंदणी करणे अपेक्षित आहे. यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा त्या शाळेला उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. याशिवाय शहरातील ७ महाविद्यालयांमध्येही झोन कार्यालय केले असून, त्याठिकाणीही भाग १,२ भरण्यासाठीची यंत्रणा निर्माण केली आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च शिक्षण उपसंचालक कार्यालय देणार आहे. मात्र, संबंधित महाविद्यालये, शाळा विद्यार्थ्यांना हव्या असलेले अभ्यासक्रम, विषय आणि महाविद्यालयांची नोंदणी करण्याऐवजी महाविद्यालय आणि शाळांचे हितसंबंध असलेल्या जागा, अभ्यासक्रमांना प्राधान्य देत विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत असल्याच्या तक्रारी काही प्राप्त झाल्या आहेत.
याचवेळी काही ठिकाणी तर विद्यार्थी, पालकांनी हवे असलेले अभ्यासक्रम, महाविद्यालय निवडतात. त्यांची प्रिंटआऊट काढल्यानंतर नोंदणी करणारा स्वत:कडे असलेल्या पासवर्डच्या आधारे विद्यार्थ्यांची पुनर्नोंदणी करून महाविद्यालयाच्या हिताची नोंदणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे.
गैरप्रकाराच्या तक्रारी दिल्यास कारवाई
याविषयी शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांची भेट घेतली असता, त्यांनी अशा पद्धतीच्या हेराफेरीची शक्यता आहे. मात्र पालक, विद्यार्थ्यांनी पासवर्ड, प्रिंटआऊटसह आमच्याकडे लेखी तक्रार करावी. तसेच नोंदणी केंद्रावर जर काही गैरप्रकार करण्यात येत असतील, तर त्याविषयीही तक्रारी कराव्यात. याविरोधात तात्काळ कारवाई करण्यात येईल, तसेच अशा पद्धतीचे गैरप्रकार रोखण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.