काळजी घ्या, नाही तर हाडे होतील ठिसूळ; चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव ठरतोय कारणीभूत
By संतोष हिरेमठ | Published: October 21, 2023 07:11 PM2023-10-21T19:11:47+5:302023-10-21T19:11:57+5:30
जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन : हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण महिलांमध्ये अधिक
छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी 'जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन' साजरा केला जातो. ऑस्टियोपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसुळता. महिलांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा ५ ते ६ पटीने अधिक आढळते. उतारवयात कमरेत वा पाठीच्या मणक्यात येणारा बाक, उतारवयात मांडीचे वा पायाचे हाड मोडणे यासाठी हाडांची ठिसुळता कारणीभूत असते. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, सूर्यप्रकाशात न जाणे अनेक बाबी हाडे ठिसूळ करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञांनी म्हटले.
व्यायाम, सकस आहार महत्त्वाचा
सामान्यतः वयाच्या चाळिशीनंतर हाडांची ठिसुळता पहायला मिळते. हार्मोनल बदलांमुळे स्त्रियांमध्ये अधिक प्रमाण आहे. ऑस्टियोपोरोटिक व्यक्तींना फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते. परंतु सकस आहारामुळे त्यास प्रतिबंध होतो. त्यासाठी कॅल्शियम आणि ‘व्हिटॅमिन डी’युक्त पूरक आहार घ्यावा. नियमित व्यायाम करावा.
- डाॅ. एम. बी. लिंगायत, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख, घाटी
आपोआप फ्रॅक्चर होते
वयाच्या ४५ वर्षांनंतर हाडाचे घनत्व कमी होण्यास सुरुवात होते. हाडे ठिसूळ होऊन ६० वर्षे वयापर्यंत मान, पाठ , कंबर दुखणे, मणक्यात आपोआप फ्रॅक्चर होणे किंवा बाक पडत जाणे, हे लक्षणे प्रामुख्याने दिसतात. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम, व्हिटॅमिन डी-३ , सोबत हॉर्मोनल थेरपीदेखील घेण्याची गरज लागू शकते. हाडे ठिसूळ होऊ नये, म्हणून नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
- डॉ. चंद्रशेखर गायके, अस्थिरोगतज्ज्ञ
फास्टफूड नकोच
आजकाल फास्टफूड संस्कृतीमुळे हाडांची ठिसुळता ही खूप सामान्य आहे. बैठी जीवनशैली, मोबाइल आणि संगणकाचा अतिवापर टाळला पाहिजे. सकस आहार, निरोगी जीवनशैली , योगासने हे हाडांची ठिसुळता टाळण्यासाठी फायदेशीर ठरते.
- डाॅ. मुक्तदीर अन्सारी, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ, घाटी
‘ऑस्टियोपोरोसिस’ची लक्षणे
-सतत मान, पाठ-, कंबर दुखणे
- पाय दुखणे
- पाठीत बाक येणे
- गुडघे दुखणे
- उंची कमी होणे
- मांडीचे, हाताचे हाड मोडणे