सावधान ! अद्याप मंजुरीच नाही अन कोरोनाचे लसीकरण होत असल्याची शहरात अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 06:09 PM2020-12-18T18:09:21+5:302020-12-18T18:13:00+5:30
corona virus in Aurangabad शासनाकडून अधिकृतपणे लस उपलब्ध करून दिलेली नसताना नागरिकांनी घाई करू नये.
औरंगाबाद : शहरात काही ठिकाणी लपूनछपून कोरोना संसर्ग विरोधक लसीकरण केले जात असल्याची अफवा पसरली आहे. अंदाजे २३०० रुपयांना ही लस दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या चर्चेत कोणताही अर्थ नसल्याचे स्पष्टीकरण महापालिका आरोग्य विभागाने दिले आहे.. अन्न व औषधी प्रशासनाने अद्याप लसीकरणासाठी कुठेही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला मनपाने दिला आहे.
मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले, लसीकरण होत असल्याबाबत अफवा कानावर येत आहेत. मात्र, शासनाकडून अधिकृतपणे लस उपलब्ध करून दिलेली नसताना नागरिकांनी घाई करू नये. अद्याप कोणत्याही लसीला अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. शासनाकडून मोफत लस दिली जाणार असून नागरिकांनी संयम पाळणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गावरील कोणत्याही लसीला शासनाची परवानगी मिळाली नाही, त्यामुळे लस मिळत असल्याची अफवा आहे. जानेवारी महिन्यात लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. लसीकरणाबाबत सगळीकडेच उत्सुकता, भय असतानाच लसीकरण होत असल्याची चर्चा समोर आली.
२५ डिसेंबरपर्यंत लसीकरणासाठी नावनोंदणीची मुदत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी शहरातील आरोग्यसेवेत काम करणाऱ्या २२ हजार ५०० जणांची नोंदणी झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार, विविध सरकारी कर्मचारी, संस्थांचे स्वयंसेवक, सेवाभावी संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे लसीकरण होईल. त्यासाठी शासनाने २५ डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत दिली आहे. अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाच्या अनुषंगाने संबंधितांना नावनोंदणी करण्याचे आवाहन मनपाने केले आहे. घाटी रुग्णालयातील सुमारे ४ हजार, एमजीएममधील दोन हजार ५००, मनपा व जिल्हा रुग्णालय २ हजार ५००, तसेच खासगी रुग्णालयातील १३ हजार ५०० डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पहिल्या टप्प्यातील नोंदणी असल्याचे पाडळकर यांनी सांगितले. कोरोनाकाळात रुग्णांवर उपचार करणाऱ्या, संसर्ग कमी करण्यासाठी काम करणाऱ्या आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन पहिल्या टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू झाली आहे. लस जानेवारी महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
१०० केंद्रांवर व्यवस्था;पोलीस बंदोबस्तही
सुमारे १०० केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात येईल. मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण होईल. पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्यात येईल. नोंदणी केलेले नाव व केंद्रावर आलेले कर्मचारी तेच आहेत का? याची खात्री झाल्यांनतर आरोग्य कर्मचारी लस देतील. मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जास्तीचे केंद्र असतील, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.