सावधान ! ज्येष्ठ नागरिकाला पाचशेच्या बंडलात आली पाचची नोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:40 PM2018-04-04T16:40:10+5:302018-04-04T16:42:04+5:30
पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये पाच रुपयांची नोट घालून बँक आॅफ महाराष्ट्रच्या शहर शाखा क्र. ३२, चौराहा येथील बँक कर्मचाऱ्याने आपली फसवणूक केल्याचा दावा ज्येष्ठ नागरिक सुभाषचंद्र वानखेडे यांनी केला.
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये पाच रुपयांची नोट घालून बँक आॅफ महाराष्ट्रच्या शहर शाखा क्र. ३२, चौराहा येथील बँक कर्मचाऱ्याने आपली फसवणूक केल्याचा दावा ज्येष्ठ नागरिक सुभाषचंद्र वानखेडे यांनी केला.
निवृत्तीवेतनधारक सुभाषचंद्र वानखेडे यांचे खाते बँक आॅफ महाराष्ट्राच्या चौराहा शाखेत आहे. त्यांना सहलीला जायचे असल्यामुळे ते पैसे काढण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी रोजी बँकेत गेले. तेथे त्यांनी ५० हजार रुपयांची विड्रॉवल स्लीप भरली आणि पासबुकसह कॅशिअरकडे दिली. यानंतर कॅशिअरने त्यांना विड्रॉवल पास करण्यासाठी वरच्या अधिकाऱ्याकडे पाठविले. या कामासाठी त्यांना ८ ते १० मिनिटांचा वेळ लागला. त्यानंतर टोकन क्र मांक आल्यावर वानखेडे पैसे घेण्यासाठी काऊंटरवर गेले.
त्यांना देण्यासाठी कॅशिअरने १०० रु. च्या १०० नोटा याप्रमाणे १० हजार दिले आणि ५०० रुपयांच्या ८० नोटा असलेले ४० हजारांचे बंडल दिले. कॅशिअरने मशीनवर नोटा मोजून दिल्या आणि त्या नोटा किती आहेत, याचा आकडा मशीनवर नीट पाहून घ्यावा, अशी सूचना केली. त्यानुसार वानखेडे यांनी केवळ आकडा पाहिला आणि काऊंटर सोडले.
त्यानंतर ते २० दिवसांची सहल पूर्ण करून घरी परतले. झालेला खर्च आणि उरलेले पैसे याचा ताळमेळ करण्यासाठी त्यांनी ते पाचशेच्या नोटांचे बंडल काढले असता त्यांना पाचशेच्या नोटांमध्ये पाच रुपयांची एक नोट आढळून आली. सदर प्रकार बँक कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वानखेडे दि. २२ मार्च रोजी पुन्हा बँकेत गेले व कॅशिअरला भेटून सविस्तरपणे माहिती दिली; पण असा प्रकार होऊच शकत नाही, असे या कर्मचाऱ्याने सांगितले. यानंतर त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भेट होऊ शकली नाही. हातचलाखी करून बँक कर्मचाऱ्याने आपली ४९५ रुपयांची फसवणूक केली आहे, असा दावा वानखेडे यांनी केला आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शिताफीने चिकटवली नोट
पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये पाच रुपयांची नवी कोरी नोट मोठ्या शिताफीने टाकलेली दिसून आली. नोट मोजण्याच्या यंत्रामध्ये पाचशेच्या नोटांबरोबर ही नोट बरोबर मोजली जावी यासाठी पाचच्या नोटेला किंचितसा डिंक लावून ती पाचशेच्या नोटेला हलकीशी चिकटविण्यात आली अणि एका विशिष्ट पद्धतीने तिची घडी घातलेली दिसून आली. ‘लोकमत’ प्रतिनिधीतर्फे सदर प्रकार नोट मोजणी यंत्रावर तपासून पाहिला. हे यंत्र केवळ खोट्या नोटा बाजूला काढून टाकत असल्यामुळे पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये पाच रुपयाची नोट अगदी सहजपणे मोजली गेल्याचे दिसून आले.
एटीएम मशीनमध्येही निघाली अशी नोट
काही दिवसांपूर्वी एका बँकेच्या एटीएममधूनही पाचशे रुपयांच्या नोटेला चिकटवलेली पाच रुपयांची नोट आल्याचा प्रकार नागरिकांनी सांगितला.
सखोल चौकशी करू
सदर प्रकाराविषयी ग्राहकाने केलेल्या तक्रारीची माहिती अजूनपर्यंत माझ्याकडे आलेली नाही. जेव्हा ही तक्रार माझ्यापर्यंत येईल तेव्हा शक्य तितक्या लवकर झालेल्या घटनेची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करण्यात येईल.
- सुधीर वाजपेयी, सहायक महाव्यवस्थापक