सावधान, सेल्फी, चित्रीकरण करताना ठेवा भान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:55 PM2018-10-20T22:55:25+5:302018-10-20T22:56:06+5:30

मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात मग्न झालेल्या अनेकांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी अमृतसर येथे घडली. नव्या पिढीच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. या फोनद्वारे छायाचित्र काढणे अगदी सोपे झाले.

Be careful, selfie, keep imagining while shooting | सावधान, सेल्फी, चित्रीकरण करताना ठेवा भान

सावधान, सेल्फी, चित्रीकरण करताना ठेवा भान

googlenewsNext
ठळक मुद्देमोबाईलचा अतिरेक : सामाजिक माध्यमांत सक्रिय राहण्यासाठी जीव धोक्यात घालण्याचा प्रकार

औरंगाबाद : मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात मग्न झालेल्या अनेकांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी अमृतसर येथे घडली. नव्या पिढीच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. या फोनद्वारे छायाचित्र काढणे अगदी सोपे झाले. यातून तरुणाईला पदोपदी मोबाईलमध्ये छायाचित्र काढणे आणि चित्रीकरणाचे एक प्रकारे व्यसन जडते आहे; परंतु सार्वजनिक ठिकाणी सेल्फी, चित्रीकरण करताना भान ठेवणे गरजेचे आहे.
मोबाईलवर सेल्फी अन् चित्रीकरणाचा नाद जिवावर बेतण्याच्या घटना घडत असताना त्यापासून कोणीही बोध घेताना दिसत नाही. पूर्वी छायाचित्र काढणे हा दुर्मिळ प्रकार होता. अनेकांना आयुष्यात एखाद-दुसरे छायाचित्र काढता येत असे. मात्र, आता आधुनिक युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेले आहेत. हे लोक दररोजच छायाचित्र, सेल्फी काढायला लागले आहेत. सामाजिक माध्यमांत सक्रिय राहण्यासाठी आणि एखादा प्रसंग व्हायरल करण्यासाठी जीव धोक्यात घालून मोबाईलमध्ये छायाचित्र काढण्याची मानसिकता वाढत आहे.
विशेषत: तरुणाईला सेल्फी, चित्रीकरणाचा मोह आवरत नाही. क्षणोक्षणी छायाचित्र काढताना आपण कुठे उभे आहोत, याचे तारतम्य पाळले जात नाही. त्यातूनच धबधब्यावरून पडून, बोटीतून पडून, वन्य प्राण्यांच्या तावडीत सापडून, रेल्वेसमोर आल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. पूर्वी संवादासाठी वापरला जाणारा मोबाईल आज अनेक कामांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे; परंतु त्याचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर अनेकांच्या जिवावर बेतत आहे. त्यामुळे किमान सार्वजनिक ठिकाणी तरी मोबाईलमध्ये चित्रीकरण करताना स्वत:बरोबर इतरांच्या सुरक्षेचा विचार करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
मोबाईलच्या कॅमेऱ्यास प्राधान्य
नवीन मोबाईल खरेदी करताना तरुणाई आजघडीला मोबाईलच्या कॅमेºयाच्या क्षमतेला अधिक प्राधान्य देत आहे. उत्पादकांनीही मोबाईलमधील कॅमेºयाची गुणवत्ता वाढविण्यासह अनेक सुविधा दिल्या आहेत. या सुविधेतून छायाचित्र अधिक चांगले येते. संकेतस्थळावर चौकशी करून मोबाईल खरेदी के ली जाते, असे मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम हक्कानी म्हणाले.
मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात...
घाटीतील मानसोपचार विभागप्रमुख डॉ. प्रदीप देशमुख म्हणाले की, इंटरनेट, सेल्फीचे व्यसन हळूहळू समोर येत आहे. मोबाईलमध्ये चित्रीकरणाचा ट्रेंड वाढत आहे. हे चित्रीकरण करताना परिसराचे भानही राहत नाही. धोकादायक व चुकीच्या ठिकाणी उभे राहून छायाचित्रे काढली जातात. चित्रीकरणही केले जाते. हे सगळे व्हायरल करण्यात आनंद मिळतो. हे थांबविण्यासाठी पालकांनी काळजी घेत स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. अशा प्रकारे मोबाईल वापरण्यामुळे होणारे नुकसान/धोके मुलांना सांगितले पाहिजेत.
जीव वाचविला
संग्रामनगर उड्डाणपुलाच्या परिसरात रेल्वे रुळावर मोबाईलमध्ये चित्रीकरण, छायाचित्र काढण्यात, तर अनेक जण हेडफोन लावून बोलण्यात मग्न झाल्याने अनेकांनी जीव धोक्यात घातल्याच्या घटना यापूर्वी समोर आलेल्या आहे. गेल्या काही महिन्यांत ७ जणांचा जीव वाचविण्यात यश आले, तर एकाला जीव गमवावा लागल्याचे श्रीमंत गोर्डे पाटील यांनी सांगितले.
काय म्हणते तरुणाई...
सामाजिक माध्यमांसाठी
सामाजिक माध्यमांचा सध्या बोलबाला आहे. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात सहभागी होतो, उपस्थित होतो, हे दाखविण्यासाठी मोबाईलवरून काढलेले सेल्फी, छायाचित्र आणि चित्रीकरण हे सामाजिक माध्यमांवर टाकण्यास प्राधान्य दिले जाते.
-अमोल वाघमारे
महत्त्वाच्या ठिकाणी छायाचित्र
छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मोबाईलवर छायाचित्र काढणे, चित्रीकरण केले जाते; परंतु मला असे करावे वाटत नाही. महत्त्वाच्या ठिकाणी आणि गरज असेल, तर तेथेच छायाचित्र काढण्यास आणि चित्रीकरणास प्राधान्य देतो.
-अमित निकोसे

मोबाईलने उघडकीस आणल्या घटना
मोबाईलमुळे अनेकांचा जीव गेल्याच्या घटनांबरोबर मोबाईलमधील चित्रीकरण, छायाचित्रामुळे अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत. त्यामुळे मोबाईलमधील कॅमेºयाचा सदुपयोगही होत असल्याचा प्रत्यय आलेला आहे.
मोबाईल वापरताना ही घ्या काळजी
१) मोबाईलमध्ये धोकादायक ठिकाणी छायाचित्र, चित्रीकरण टाळावे.
२) आवश्यकता असल्यावरच चित्रीकरणास प्राधान्य द्यावे.
३) रेल्वे रूळ, रस्ता, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा.
४) छायाचित्र, चित्रीकरणादरम्यान एखादा अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
५) सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितपणे वापर करावा.

Web Title: Be careful, selfie, keep imagining while shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.