सांभाळा बरे, दुसऱ्या लाटेच्या दीडपट बाधित तिसऱ्या लाटेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:04 AM2021-07-28T04:04:22+5:302021-07-28T04:04:22+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा बाजूला ठेवत आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दुसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण आढळले, त्याच्या ...
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा बाजूला ठेवत आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दुसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण आढळले, त्याच्या दीडपट बाधित तिसऱ्या लाटेत आढळण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तविली जात आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून, १५ ऑगस्टपूर्वी उपचार सुविधा उभ्या करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचा एकच कहर पहायाला मिळाला. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आणि मृत्यूचेही प्रमाण वाढले. दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेची ऑक्सिजनपासून इतर उपचार सुविधांच्या बाबतीत कसोटीच लागली. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आतापासूनच खबरदारीची पावले टाकत आहे. उपचार सोयीसुविधा वाढीसाठी सध्या सुरू असलेली कामे १५ ऑगस्टआधी पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. दुसऱ्या लाटेच्या दीडपट रुग्ण तिसऱ्या लाटेत आढळण्याची शक्यता आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
३ हजारांपर्यंत रुग्ण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन हजारांच्या घरात एका दिवशी नव्या रुग्णांची भर पडली. तिसऱ्या लाटेत ही संख्या ३ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दीड महिन्याच्या कालावधीत जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होईल, यावरही भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.