भगर खाताना काळजी घ्या; मराठवाड्यात ६०२ जणांना भगरीतून विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 03:29 PM2024-03-09T15:29:46+5:302024-03-09T15:30:13+5:30
मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर : विजया भागवत एकादशीच्या निमित्ताने मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बनविलेली भगर खाल्ल्याने मराठवाड्यात जवळपास ६०२ भाविकांना विषबाधा झाली. त्यांच्यावर तातडीने उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. हा आकडा यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. कारण अनेक रुग्णांनी परस्पर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यामुळे रुग्णांची माहिती मिळाली नाही.
लातूर जिल्ह्यात महाप्रसादातील भगर खाल्ल्याने देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथील ४४३ जणांना गुरुवारी रात्री मळमळ, चक्कर येऊन विषबाधा झाली. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी येथे एकादशीनिमित्ताने गुरुवारी सायंकाळी भगरीचा प्रसादाचे आयोजित करण्यात आला. तो खाल्ल्याने गावातील जवळपास ३१५ जणांना रात्री मळमळ, उलटी, चक्कर येण्यास सुरुवात झाली. गावातच ३०६ जणांवर उपचार केले तर सहा जणांना देवणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. खबरवाडी (गुरधाळ) येथेही भगरीतून १२८ जणांना उलटी, मळमळ, डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. गावात ९३ जणांवर प्रथमोपचार केले.
परभणी जिल्ह्यात गुरुवारी, शुक्रवारी दोन दिवस उपवासाला भगर खाल्ल्याने जिल्ह्यातील ८० जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील ५० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी शुक्रवारी दिली. शुक्रवारी परभणी तालुक्यातील झरी येथे ४, इठलापूर येथे ६, ब्रह्मपुरी ३, अवलगाव १, बोरवंड १, बडवली १, खडका १ व परभणी शहरातील विविध भागांतील १६, तसेच पेडगाव येथील १९, गंगाखेड येथील १० अशा एकूण ८० जणांना भगर सेवन केल्यानंतर मळमळ, उलटी आदी त्रास जाणवू लागला. दरम्यान, गंगाखेडला १०, झरीत १०, जिंतूरला सात जणांना विषबाधा झाली. तर पेडगाव प्रा. आ. केंद्रात १९ जणांवर उपचार सुरू आहेत.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई व गेवराई तालुक्यातील तब्बल ५५ जणांना विषबाधा झाली. उपवासाची भगर खाल्ल्याने ही बाधा झाल्याचे सांगण्यात आले. या सर्वांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात सर्वांत जास्त निरपणा येथील १४ रुग्ण आहेत, तर मगरवाडी ५, जवळगाव ५, अंबाजोगाई ११, धानोरा, पट्टीवडगाव, वाघाळा, वाघाळवाडी, चनई प्रत्येकी २, गित्ता, करेवाडी प्रत्येकी १, असे रूग्ण आहेत. गेवराई शहरातील दाभाडे गल्लीतील चार महिलांनाही गुरुवारी अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात भगर खाल्ल्याने सेनगाव तालुक्यातील खुडज येथील २४ भाविकांना विषबाधा झाली. यातील २० भाविकांना सेनगाव येथील शासकीय रुग्णालयात, तर एका भाविकास हिंगोली येथील खासगी रुग्णालयात ७ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले. या भाविकांची प्रकृती स्थिर आहे.