चष्म्याऐवजी काॅन्टॅक्ट लेन्स वापरताना काळजी घ्या, नाहीतर पडेल महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:02 AM2021-08-27T04:02:02+5:302021-08-27T04:02:02+5:30
औरंगाबाद : कोणी चेहऱ्यावर चष्मा नको म्हणून, तर कोणी चेहऱ्याचे सौंदर्य राखले जावे म्हणून काॅन्टॅक्ट लेन्स वापरत आहे. अगदी ...
औरंगाबाद : कोणी चेहऱ्यावर चष्मा नको म्हणून, तर कोणी चेहऱ्याचे सौंदर्य राखले जावे म्हणून काॅन्टॅक्ट लेन्स वापरत आहे. अगदी तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण काॅन्टेक्ट लेन्सला पसंती देत आहे. मात्र, लेन्स वापरताना पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा जंतुसंसर्ग होऊन ते डोळ्यासाठी चांगलेच महागात पडू शकतात. त्यामुळे योग्य पद्धतीने काॅन्टॅक्ट लेन्स वापरावेत, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.
चष्मा लागला, असे निदान होताच अनेक जण स्वत:हूनच काॅन्टॅक्ट लेन्स वापरता येईल का, अशी नेत्रतज्ज्ञांना विचारणा करतात. काॅन्टॅक्ट लेन्सचा योग्य वापर केल्यास ते चष्म्यासाठी उत्तम पर्याय आहे. असे असतानादेखील त्यांच्या वापरामध्ये धोकेसुद्धा तेवढेच आहेत. आजकाल लेन्सचा वापर अधिकाधिक वाढत आहे. मात्र, चांगल्या दर्जाची लेन्स वापरली पाहिजे. सोबतच लेन्स नेमकी कशापद्धतीने वापरावी, हेदेखील माहीत करून घेणे गरजेचे असते. अन्यथा डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते.
चष्म्याला करा बाय बाय
चष्मा लागण्याचे कारण काहीही असो. मात्र, अनेकांना चष्म्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. चष्मा आहे म्हणून विवाहात अडथळा येतो, असा अनेकांचा अनुभव आहे. कॉन्टॅक्ट लेन्समुळे चष्म्यापासून सुटका मिळू शकते. लेन्स डोळ्याच्या आत असल्यामुळे तो बाहेरून दिसत नाही. त्यामुळे लेन्स वापरण्याकडे विशेषत: तरुणांचा अधिक ओढा आहे.
..ही घ्या काळजी
१. काॅन्टॅक्ट लेन्सची स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. लेन्स वापरताना आणि वापर करून झाल्यानंतर लेन्सच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. लेन्ससाठी असलेल्या द्रवपदार्थाचा वापर करावा लागतो. शिवाय लेन्स ६ ते ८ तासांपेक्षा अधिक वेळ वापरता कामा नये.
२. झोपताना लेन्स वापरता कामा नये. कारण झोपेदरम्यान डोळे कोरडे होतात, तसेच डोळ्यांना होणारा ऑक्सिजन पुरवठादेखील कमी होतो आणि अशावेळी जर लेन्स घातलेली असेल तर डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. यामुळे सर्वोत्तम पर्याय म्हणजे झोपताना लेन्सचा वापर करू नये.
नेत्रतज्ज्ञ म्हणतात..
काॅन्टॅक्ट लेन्स डोळ्यावर ६ ते ८ तासांपेक्षा अधिक वेळ राहू नये. त्यामुळे या कालावधीचे नियोजन करून त्यांचा वापर केला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे स्वच्छतेचे भान ठेवले पाहिजे. अन्यथा डोळ्याला संसर्ग होण्याची भीती असते.
- डाॅ.वर्षा नांदेडकर, नेत्र विभागप्रमुख, घाटी
---
ज्यांना शक्य आहे, त्यांनी काॅन्टॅक्ट लेन्स वापरावी. सगळ्यांनीच ते वापरावे असे नाही. मात्र, ज्यांना चष्मा लागलेला आहे, त्यांनी चष्म्याचा वापर नियमित करणे आवश्यक असते. काॅन्टॅक्ट लेन्स वापरताना अतिशय काळजी घेतली पाहिजे.
- डाॅ. ज्योती मुंढे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक