सावधान ! पेट्रोल पंपांवर तुमची लुबाडणूक होत नाही ना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:35 PM2018-01-25T12:35:50+5:302018-01-25T12:38:19+5:30

पेट्रोलपंपांवर केल्या जाणार्‍या इंधन चोरीच्या तसेच पेट्रोलमध्ये पाणी आढळण्याच्या एकामागून एक घटना उघडकीस येत असल्याने मापात पाप करून शहरामध्ये कोट्यवधींच्या लुटीचा गोरखधंदा सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे.

Be careful! You do not have a spoof on petrol pumps ? | सावधान ! पेट्रोल पंपांवर तुमची लुबाडणूक होत नाही ना ?

सावधान ! पेट्रोल पंपांवर तुमची लुबाडणूक होत नाही ना ?

googlenewsNext

- मयूर देवकर 

औरंगाबाद : पेट्रोलपंपांवर केल्या जाणार्‍या इंधन चोरीच्या तसेच पेट्रोलमध्ये पाणी आढळण्याच्या एकामागून एक घटना उघडकीस येत असल्याने मापात पाप करून शहरामध्ये कोट्यवधींच्या लुटीचा गोरखधंदा सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. पंपांवरील इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत घोळ करून, हातचलाखी करून, ग्राहकांचे लक्ष विचलित करून किंवा पाणीमिश्रित इंधनातून वाहनधारकांच्या पैशांवर डल्ला मारणार्‍या पंपचालकांवर कारवाई कधी होणार, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.

शिवाजीनगर येथील पंपावर मंगळवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ग्राहकांशी संवाद साधला असता वेगळीच भीती समोर आली. आपण जेवढे पैसे मोजले आहेत तेवढे इंधन मिळेल का? मापात पाप करून लुबाडणूक तर होत नाही ना? अशी शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. ग्राहकांचा पंपांवरील विश्वास उडाल्याचे हे संकेत आहेत. 

आधीच ८१ रुपये प्रतिलिटर पेट्रोलमुळे खिसा रिकामा होत असताना इंधन चोरीचाही मारा औरंगाबादकरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. पोलीस, वजन व मापे विभाग, आॅईल कंपन्या आणि पुरवठा अधिकार्‍यांकडे दैनंदिन तक्रारी येत आहेत. परंतु व्यस्तता आणि तेवढी कार्यक्षम व मदतशील यंत्रणेचा अभाव असल्याने लोक त्या तक्रारींचा पाठपुरावा करीत नाहीत. येथेच पंपचालकांचे फावते, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

अशी होते चोरी 
 

या क्षेत्रात काम करणार्‍या एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला पंपावर इंधन चोरी कशी केली जाऊ शकते याची माहिती दिली.

पूर्वनिश्चित रक्कम व माप :
अनेक पंपांवर शंभर, पाचशे, एक हजार रुपये किमतीचे माप मशीनमध्ये एक बटणावर पूर्वनिश्चित केलेले असते. प्रत्यक्षात मात्र तेवढ्या किमतीचे इंधन मिळेलच याची शाश्वती नाही. यामध्ये काही मिलिलिटरने इंधन कमी देण्याची व्यवस्था केली जाते.

मायक्रोचीप :
पंपामध्ये आधीच प्रोगॅ्रमिंग करून ठेवलेली एक मायक्रोचीप बसविण्यात येते. चीपद्वारे पल्सचा वेग वाढवून इंधन पडण्याचा वेग कमी केला जातो. त्यामुळे पंपाचे मीटर वेगाने फिरताना दिसते खरे; मात्र त्या प्रमाणात इंधन पडत नाही. लिटरमागे किती इंधन चोरी करायचे हे प्रमाण आधीच निश्चित केले जाते. चीपला रिमोट कंट्रोलद्वारेदेखील नियंत्रित केले जाऊ शकते. कोणाला संशय आल्यास रिमोटने चीप बंद केली जाते. त्यामुळे मीटर सामान्य गतीपेक्षा जास्त वेगाने फिरत आहे का याची खात्री करून घ्या.

यंत्रणेत घोळ :
पंपांवरील मशीनमध्ये काही बिघाड आल्यास ती मशीन ज्या कंपनीची आहे त्या कंपनीच्या अधिकृत तंत्रज्ञाने ती दुरुस्त करणे अपेक्षित असते. मात्र, पंपचालक अनधिकृत तंत्रज्ञांच्या साह्याने यंत्रणेत काही घोळ करून इंधन चोरी करू शकतात.

पाणीमिश्रित इंधन :
इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या नावाखाली अनेक पंपचालक पाणी मिसळून इंधन विक्री करतात. पेट्रोलमध्ये पाणी आढळून येत असल्याच्या शहरात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. इंधन चोरीचा हादेखील एक उपाय बनला आहे.

लक्ष विचलित करणे :
इंधन भरताना मशीनवर ‘शून्य’ असणे गरजेचे असते. परंतु अनेकदा पंपांवरील कर्मचारी ग्राहकांचे लक्ष विचलित करून लुबाडणूक करतात. काही सेकंदासाठी जरी ग्राहकांची नजर मीटरवरून दूर गेली की तरी नुकसान झालेच म्हणून समजा. त्यामुळे प्रत्येक वेळेस मीटर शून्यावर रिसेट करण्यावर भर द्या.

लांब पाईप :
इंधन भरण्यासाठी आकाराने लांब पाईप वापरूनही मापात पाप केले जाऊ शकते. इंधन भरल्यावर कर्मचारी टाकीतून नोजल बाहेर काढण्याची घाई करतात. त्यामुळे पाईपमध्ये काही प्रमाणात इंधन शिल्लक राहते. त्यामुळे ग्राहकांनी मीटरवर आकडा पूर्ण झाला तरी काही सेकंदाकरिता नोजल टाकीतच राहू द्यावा.जेव्हा पाईप मोठा असेल तेव्हा गाडी थोडी दूर लावून इंधन भरावे. जेणेकरून पाईप ताणलेला राहील आणि पूर्ण इंधन पडेल.

ग्राहकांनी काय करावे?
पंपावर इंधनाची घनता, वॉटर टेस्ट आणि इंधन मोजमाप करण्याचा सर्व ग्राहकांना अधिकार असतो.इंधन चोरीचा संशय अथवा गैरप्रकार आढळल्यास ग्राहकांनी आवर्जून वजन मापे विभागाकडे तक्रार करावी.इंधन भरल्यानंतर बिल अवश्य घ्यावे. तक्रार नोंदविण्यासाठी ते गरजेचे असते. एकाच पंपावरून पेट्रोल भरण्याऐवजी वेगवेगळ्या पंपांवरून पेट्रोल भरावे.

पुरवठा अधिकारी कदम म्हणतात... पंपचालक योग्यच, ग्राहकच चुकीचे!

तत्पूर्वी राज पेट्रोल पंपावरून पाणीमिश्रित पेट्रोल मिळत असल्याची तक्रार एका ग्राहकाने बुधवारी के ली. तेव्हा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम सदर पेट्रोल पंपावर आले. त्यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत पंपात पाणी मिसळलेले नसल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. ‘लोकमत’ने डॉ. कदम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दिलेली उत्तरे पंपचालकांचा बचाव करताना ग्राहकांना दोष देणारीच अधिक होती. त्यांच्याशी झालेला संवाद शब्दश: असा...

- प्रतिनिधी : पाणीमिश्रित पेट्रोलसंदर्भात लोकांच्या तक्रारी अचानक का वाढल्या असाव्यात ? 
कदम : पेट्रोलमध्ये पाणी आढळण्याची अनेक कारणे असू शकतात. गाडी धुतानादेखील पाणी जाऊ शकते. आमच्या तपासणीत अद्याप काहीही गैर आढळून आले नाही.
- प्रतिनिधी : शहरात इंधन चोरी होतच नाही, असे आपल्याला वाटते का?
कदम : अद्याप काही गैर आढळले नाही म्हणजे तसेच म्हणावे लागेल.
- प्रतिनिधी : चोर पकडला गेला नाही, तर चोरी झालीच नाही, असे मानायचे?
कदम : काहीही अर्थ काढले जाऊ शकतात. सध्या तरी शहर इंधन चोरीमुक्त आहे.

Web Title: Be careful! You do not have a spoof on petrol pumps ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.