'डिमांडर नव्हे, कमांडर बना'; पंकजा मुंडे यांना महादेव जानकर यांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 08:22 PM2021-08-09T20:22:02+5:302021-08-09T20:23:21+5:30
Mahadev Jankar's advice to Pankaja Munde : शेवटी हा भाजपअंतर्गतचा प्रश्न आहे; पण पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे
औरंगाबाद : डिमांडर नव्हे तर कमांडर बना. ओबीसींनी स्वत:चे घर बांधावे, किरायाच्या घरात राहू नये, असा सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर ( Mahadev Jankar ) यांनी सोमवारी येथे दिला. भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde )यांची भाजपमध्ये कोंडी करण्याचा प्रकार चालू असल्याबद्दल जानकर यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी हा सल्ला दिला. शेवटी हा भाजपअंतर्गतचा प्रश्न आहे; पण पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे; पण अन्याय झाला असे ती अजून मला म्हणालीच नाही. फोनपण नाही केला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ('Be a Commander, Not a Demander'; Mahadev Jankar's advice to Pankaja Munde)
...तर भाजपशीही मैत्री तोडू
ओबीसीला राजकीय आरक्षण मिळाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका होऊ न देण्याचा तसेच ओबीसीची जनगणना केंद्र सरकारने केली नाही तर भाजपशी असलेली मैत्रीही तोडण्याचा इशारा यावेळी जानकर यांनी दिला.
धनगर आरक्षण अशक्य?
एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, काही अपरिहार्य तांत्रिक बाबींमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळाले नसले तरी मी मंत्री असताना धनगर समाजाच्या विविध विकास योजनांसाठी केलेली एक हजार कोटींची तरतूद तशीच धूळखात पडून आहे. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्यासंंबंधी नियुक्त करण्यात आलेल्या आयोगाचा अहवालही नकारात्मक आला; परंतु धनगर समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी केलेल्या तरतुदींपैकी चारशे कोटी मंजूरही केले होते. राज्य सरकार त्यावर अंमलबजावणी करायला तयार नाही.
आगामी काळात येणारी औरंगाबाद मनपाची निवडणूक स्बळावर लढणार असल्याची घोषणा जानकर यांनी केली. पत्रपरिषदेस पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतोले, प्रदेश प्रवक्ते प्रा. भास्कर टेकाळे, मराठवाडा संपर्क प्रमुख अशोक लांडे, सुरेश कटारे, राशीद खान, दिलीप रिठे, परमेश्वर वाघमोडे आदींची उपस्थिती होती.