अनुकंपाच्या सरकारी नोकरीसाठी बीई, एमटेक पदवीधर खाजगी नोकरीवर सोडणार पाणी
By विकास राऊत | Published: July 28, 2023 04:08 PM2023-07-28T16:08:50+5:302023-07-28T16:09:08+5:30
११ वर्षांपासून हे उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षा यादीत होते. त्यांना आता संधी मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : अनुकंपाच्या नोकरीसाठी एम.टेक, बी.ई पदवीधारकांसह उच्चशिक्षित उमेदवारांनी खाजगी नोकरीवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ७ ऑगस्टला २७ उमेदवारांना तलाठी व इतर पदांवर संधी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. मागील ११ वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले परंतु जिल्हा प्रशासनाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे.
११ वर्षांपासून हे उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षा यादीत होते. त्यांना आता संधी मिळणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी अनुकंपा उमेदवारांची कागदपत्रे तपासली असता बरेच उमेदवार उच्चशिक्षित असल्याचे दिसले. अभियंता व इतर खाजगी सेवेत काम करणाऱ्या या उमेदवारांनी तिकडील नोकरी अनुकंपाच्या संधीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत बुधवारी बैठक घेतली.
अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षा यादी मोठी आहे. जिल्हा प्रशासनातील बहुतांश अनुकंपाधारकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. परंतु इतर विभागांत जागा नसल्यामुळे २७ उमेदवारांना जिल्हा प्रशासनात सामावून घेण्यात येणार आहे. खाजगी नोकरीत चांगले वेतन असले तरी सुरक्षितता नसल्यामुळे अनेक उमेदवारांनी अनुकंपावरील नोकरीला प्राधान्य दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांनी सांगितले.
सगळ्या विभागांत प्रतीक्षा यादी
जिल्ह्यातील पाटबंधारे, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदासह इतर विभागांत अनुकंपा भरतीची मोठी प्रतीक्षा यादी आहे. उपलब्ध जागांपैकी २० टक्केच जागा अनुकंपासाठी उपलब्ध होतात. त्यामुळे अनेकांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते आहे. दरम्यान, उमेदवारांना वयोमर्यादा संपण्याची भीती असून त्यांना कधी संधी मिळणार, असा प्रश्न आहे.