कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत परजिल्ह्यातील रुग्णांसाठी तयारीत राहा, प्रशासनाला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 06:08 PM2021-08-03T18:08:38+5:302021-08-03T18:11:13+5:30
Corona Virus : मराठवाड्यात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मायक्रो प्लानिंग करण्यात येत आहे.
औरंगाबाद : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याच्या आणि डेल्टा प्लसचे रुग्ण वाढण्याच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणेने आतापासूनच नियोजनास सुरुवात केली आहे. औरंगाबाद शहरात मराठवाड्यासह इतर ठिकाणांहून २५ टक्के रुग्ण उपचारांसाठी येतील, हे गृहीत धरूनच तयारी ठेवावी, अशा सूचना विभागीय प्रशासनाने यंत्रणेला केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १३ जिल्ह्यातील सुमारे दोन हजार रुग्ण औरंगाबादेत उपचारासाठी होते. संभाव्य तिसऱ्या लाटेतदेखील औरंगाबादेत जास्तीचे रुग्ण येऊ शकतात, अशी शक्यता प्रशासनाला वाटते आहे.
मराठवाड्यात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मायक्रो प्लानिंग करण्यात येत आहे. विभागीय प्रशासन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन वेळा तरी ऑनलाईन बैठक घेत सूचना करीत आहे. सर्व जिल्ह्यांतील ऑक्सिजनची सद्य:स्थिती, पुरवठ्यासाठीचे प्रयत्न, रोजची संभाव्य गरज तपासली जात आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनसाठी पुरवठा करताना प्रचंड तारांबळ झाली. शिवाय विभागीय प्रशासनाला चाकण, रायगड येथील यंत्रणेशी वाद घालावे लागले. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ऑक्सिजन रुग्णांना दिले गेले. त्याचे ऑडिट केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या त्रुटींचा विचार करण्यात आला. असा सगळा प्रकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान होऊ नये, अशा सूचना विभागीय प्रशासनाने दिल्या आहेत. हिंगोली, नांदेड, परभणीतील नियोजन बऱ्यापैकी आहे. जालना, बीड आणि उस्मानाबाद व औरंगाबादमध्ये नियोजनासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत. लातूरमध्येही तशीच परिस्थती आहे.
असे करा नियोजन
पाच हजार सिलिंडर विभागात दररोज लागतील, असे गृहीत धरण्यात यावे. त्यातच दोन हजार सिलिंडर स्टॉकमध्ये असतील, याचा विचार करावा. उरलेले तीन हजार सिलिंडरपैकी एक हजार वाहतुकीत असतील, एक हजार हॉस्पिटलमध्ये, तर एक हजार फिलिंग स्टेशनवर असतील, असा विचार करावा. जर या पद्धतीने मायक्रो प्लानिंग केले, तर दुसऱ्या लाटेत जो त्रास झाला तसा होणार नाही अशा सूचना विभागीय प्रशासनाने दिल्या आहेत.
सहा जणांची कोअर टीम केली स्थापन
मराठवाड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यास दीडपट रुग्णसंख्या असेल, हे गृहीत धरून नियोजन करण्यासाठी विभागात सहा उपायुक्तांची विशेष कोअर टीम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्थापन केली आहे. महसूल उपायुक्त पराग सोमण, उपायुक्त वीना सुपेकर, जगदीश मिनीयार, अविनाश पाठक, शिवाजी शिंदे आणि रश्मी खांडेकर यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. प्राधान्याने बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा यावरच ही टीम लक्ष देत आहे.