आहारात मीठ अन् मिठात आयोडीनचे प्रमाण जपावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:31 PM2019-05-24T23:31:11+5:302019-05-24T23:31:37+5:30
दररोजच्या आहारात मिठाचे योग्य प्रमाण जपण्याची गरज आहे. कारण मिठातूनच शरीराला विशेषत: थायरॉईड ग्रंथीला आयोडीन मिळते. या ग्रंथीला पुरेसे आयोडीन मिळाले नाही, तर गलगंड, थकवा, उदासीनता, विसरभोळेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आदींना सामोरे जावे लागते.
औरंगाबाद : दररोजच्या आहारात मिठाचे योग्य प्रमाण जपण्याची गरज आहे. कारण मिठातूनच शरीराला विशेषत: थायरॉईड ग्रंथीला आयोडीन मिळते. या ग्रंथीला पुरेसे आयोडीन मिळाले नाही, तर गलगंड, थकवा, उदासीनता, विसरभोळेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आदींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मिठातील आयोडीनचे प्रमाण जपण्याची गरज असल्याचे बालस्थूलतातज्ज्ञ डॉ. प्रीती फटाले म्हणाल्या. जागतिक थायरॉईड दिनानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
थायरॉईड ग्रंथी म्हणजे काय आहे?
प्रत्येकाच्या गळ्यात थायरॉईड ही फुलपाखरासारखी ग्रंथी असते. त्यातून प्रामुख्याने थायरॉक्सिन आणि ट्रायआय डोथारोनीन ही दोन संप्रेरके स्रवत असतात. ही संप्रेरके मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीद्वारे स्रवली जातात. थायरॉईड संप्रेरक शरीराची वाढ, विकास, शरीराचे तापमान, चयापचय, ऊर्जेचे नियोजन, मासिक पाळी आणि स्नायूंची शक्ती नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आयोडीन हा आवश्यक घटक आहे.
प्रश्न : थायरॉईड ग्रंथीचा विकार कोणाला होतो?
उत्तर : डिसेंबर २०१८ मध्ये फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि रिसर्च इंडियाद्वारे प्रसिद्ध केलेल्या लेखानुसार भारतीय लोकसंख्येच्या सरासरी ३२ टक्के लोक थायरॉईड ग्रंथीच्या वेगवेगळ्या विकारांनी म्हणजे गलगंड, हायपोथायरॉयडिजम््, हायपरथायरॉयडिजम्, थायरोडायटिस आणि थायरॉईड कर्करोगाने ग्रस्त आहेत. थायरॉईड ग्रंथीचा आजार मुली, स्त्रियांनाच नव्हे, तर पुरुष आणि मुलांनाही होऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार याप्रमाणेच थायरॉईड ग्रंथीचे विकार घराघरांत पोहोचले आहेत. आहारात आयोडीनच्या अपुऱ्या प्रमाणामुळे विकार उद््भवतात.
प्रश्न : आयोडीन कमी पडल्याने कोणता धोका संभवतो?
गर्भधारणेदरम्यान मातेला आयोडीनचा पुरवठा कमी पडल्यास नवजात अर्भकात जन्मजात हायईपोथायरॉडिजम् हा विकार उद्भवू शकतो. बाळ दूध व्यवस्थितपणे न पिणे, जास्त झोपणे, कावीळ जास्त काळ राहणे आदी लक्षणे आहेत. नवजात अर्भकाची वाढ आणि विकास खुंटून मूल मतिमंद होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे गर्भावस्थेत मातेला पुरेसे आयोडीन मिळण्याची खात्री करणे गरजेचे असते.
प्रश्न : मिठातील आयोडीनचे प्रमाण कसे जपावे?
उत्तर : अन्न शिजविताना मिठाचा वापर न करता ताटात मीठ वाढले पाहिजे. मिठाचा पुडा फोडल्यानंतर एक महिन्यानंतर त्यातील मिठ वापरता कामा नये. ते इतर गोष्टींसाठी वापरावे. मीठ स्वयंपाकघरात, शेगडीजवळ, उन्हात ठेवू नये. ते कायम हवाबंद डब्यात ठेवावे.