बीट मार्शल आणि वाहतूक हवालदाराला धक्काबुक्की
By Admin | Published: June 28, 2014 01:07 AM2014-06-28T01:07:43+5:302014-06-28T01:20:57+5:30
औरंगाबाद : ड्यूटीवर कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाच गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याच्या घटना गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या.
औरंगाबाद : ड्यूटीवर कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाच गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याच्या घटना गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. या प्रकरणी जिन्सी आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
भांडण सोडविणाऱ्या बीट
मार्शलला धक्काबुक्की
जिन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल संतोष तुकाराम पारधे हे गुरुवारी रात्री १०.५५ वाजेच्या सुमारास बीट मार्शल म्हणून गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना नागसेन कॉलनी येथे भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली.
ते तेथे पोहोचले आणि भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करू लागले. त्यावेळी आरोपी सलीम कुरेशी रज्जाक कुरेशी (रा. नागसेन कॉलनी) याने पारधे यांनाच भांडण सोडविण्यासाठी कशाला आला, असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तेव्हा त्यांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पारधे यांचीच गच्ची पकडून लोटालोट केली, त्यांना धक्काबुक्की केली. या घटनेची माहिती पारधे यांनी वरिष्ठांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी पारधे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सलीम कुरेशीविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.
वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत रिक्षाचालकाची हुज्जत
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाविरोधात कारवाई करीत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबलसोबत रिक्षाचालकाने चांगलीच हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केल्याची घटना गारखेडा परिसरातील गजानननगर येथे घडली.
शहर वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल अविनाश महादेव ढगे हे गजानननगर भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करीत होते. त्यावेळी रिक्षा क्रमांक एमएच-२०, बीटी ७५११ हा तेथून जाऊ लागला.
यावेळी पोलिसांनी रिक्षाचालक गौतम आबाजी वाहूळ (४५, रा. जयभवानीनगर) यास थांबविले असता त्याने आपली रिक्षा थेट पोलिसांच्या टू मोबाईल वाहनासमोरच सिनेमास्टाईलने उभी केली.
यावेळी त्याने मोठ्यमोठ्याने आरडाओरड करीत पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कॉन्स्टेबल ढगे यांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपी रिक्षाचालकाने त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली.
यावेळी ढगे यांच्यासोबत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी त्यास ताब्यात घेऊन मुकुंदवाडी ठाण्यात नेले. त्याच्याविरोधात ढगे यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कसबे करीत आहेत.