शेतात ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:07 AM2021-03-04T04:07:10+5:302021-03-04T04:07:10+5:30
अजिंठा : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरीत ट्रॅक्टर शेतात नेण्याच्या कारणावरून एका व्यक्तीस तिघांनी बेदम मारहाण केली, तर दुसरीकडे ...
अजिंठा : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरीत ट्रॅक्टर शेतात नेण्याच्या कारणावरून एका व्यक्तीस तिघांनी बेदम मारहाण केली, तर दुसरीकडे गोळेगावात जुन्या भांडणावरून एकास चौघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली. अजिंठा पोलीस ठाण्यात दोन्ही तक्रारींत ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरीत सोमीनाथ लक्ष्मण बोराटे या १९ वर्षीय तरुणाला शेतातून ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून शेताशेजारील सांडू शेख, हारून कालू शेख, कालू याकूब शेख या तिघांनी लाठ्या काठ्या, बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या सोमीनाथला औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार राजू राठोड, अक्रम पठाण करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत गोळेगाव राजेंद्र गजानन मोरे याला जुन्या भांडणाचा कारणावरून गावातीलच त्र्यंबक तुळशीराम गिरी, विशाल त्र्यंबक गिरी, सुभाष तुळशीराम गिरी, ज्ञानेश्वर इंगळे या चौघांनी संगनमत करून लोखंडी रॉड व लाकडी फळीने मारहाण केली. यात राजेंद्रचे पाय फॅक्चर झाले असून, त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. राजेंद्र मोरेच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आबासाहेब आव्हाड, बाबासाहेब साळवे करीत आहेत.