जगभरातील ७०३ स्पर्धकांना मात देत औरंगाबादची गायिका ठरली अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 09:09 PM2021-02-26T21:09:29+5:302021-02-26T21:10:07+5:30
स्पर्धेत अव्वल ठरलेल्या वर्षा जोशी यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण परभणी जिल्ह्यातील सेलू येथे झाले आहे.
औरंगाबाद : जगभरातून तब्बल ७०३ गायक-गायिकांचा सहभाग घेतलेल्या व अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘राजा आणिक राणी’ या मराठी सुगम गीतगायन स्पर्धेत औरंगाबादच्या गायिका वर्षा किरण जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. तब्बल चार महिने चालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल २२ फेब्रुवारीस जाहीर करण्यात आला. अंतिम फेरीतील दहा उत्कृष्ट गायकांतून वर्षा जोशी या सर्वोत्कृष्ट ठरल्या आणि त्यांनी प्रथम येण्याचा मान मिळवला.
माणिक निर्मित व डाॅ. अजित पाडगांवकर, ज्ञानेश देव, अतुल अरुण दाते यांची प्रस्तुती असलेली ‘राजा आणिक राणी’ ही मराठी गीतगायन स्पर्धा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात आॅनलाइन स्वरूपात पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत १० जण निवडले गेले. त्यात वर्षा जोशी यांनी पहिला, तर साताऱ्याच्या प्राजक्ता भिडे यांनी दुसरा क्रमांक मिळवला. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पनवेलच्या मानसी अंबुर्ले व पुण्याच्या स्वरूपा बर्वे यांना विभागून देण्यात आले.
स्पर्धेत अव्वल ठरलेल्या वर्षा जोशी यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण सेलू येथे गंगाधर कान्हेकर, यशवंत चारठाणकर यांच्याकडे झाले. पुढे परभणी येथे कृष्णराज लव्हेकर यांच्याकडे त्यांनी सुगम संगीताचे शिक्षण घेतले. या स्पर्धेत त्यांनी गीतकार मंगेश पाडगावकरांचे ‘आले मनात माझ्या’ हे गाणे सादर केले होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत चैत्रल वझे, डाॅ. कृपा सावंत, मंदार जाधव, स्वानंद भुसारी, राजसी वैद्य, विशाल भांगे आदींनी मजल मारली. दरम्यान, आपल्या बहारदार सादरीकरणाने या मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेवर कलेची मोहोर उमटविणाऱ्या वर्षा जोशी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.