असा हा सुंदर 'गणपतीचा बंगला'... 'या' बंगल्यात नजर जाईल, तिथे बाप्पाच दिसतो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:16 PM2019-09-05T12:16:18+5:302019-09-05T12:21:19+5:30
श्रीगणेशाच्या विविध रूपातील मूर्ती, साहित्याचा संग्रह
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : शरणापूर परिसरातील निसर्गरम्य वातावरणातील तो बंगला आता गणपतीचा बंगला म्हणून नावारूपास येत आहे. त्या बंगल्यात नजर जाईल तिकडे गणपतीचेच दर्शन होते. देशभरातील मूर्तिकारांनी साकारलेल्या वेगवेगळ्या रूपातील मूर्ती आणि गणाधीपतींवरील विपुल साहित्यही येथे आहे. एवढेच नव्हे तर विनायकाला आवडतात तेच फूल, झाड येथील अंगणात लावण्यात आले आहेत. गणपती भक्त, अभ्यासकांसाठी हा बंगला खजिन्यापेक्षा काही कमी नाही.
न्यायाधीश चारुलता पटेल यांचा हा बंगला. त्यांनी निवृत्तीनंतरचे आपले उर्वरित आयुष्य गणेश भक्तीला समर्पित केले आहे. त्यांनी ही भक्ती धार्मिक कार्यापुरतीच मर्यादित ठेवली नाही. त्यापुढे जाऊन श्रीगणेशाच्या विविध रूपातील मूर्ती, साहित्याचा संग्रह करणे सुरू केले. देशभरातून आणलेल्या १ हजारांपेक्षा अधिक मूर्ती आज त्यांच्या संग्रहात आहेत. गणरायाचे सुमारे ६० हजारांपेक्षा अधिक छायाचित्रे त्यांच्याकडे आहेत. यात बालगणेशाचे शेकडो छायाचित्रे आहेत. विविध वर्तमानपत्रांत आलेले बाप्पाचे छायाचित्रे, कार्टूनच्या कात्रणांची त्यांनी आकर्षक मांडणी केली आहे.
याशिवाय १९९० नंतर गणेशोत्सवानिमित्त प्रकाशित विशेष मासिकांचाही संग्रहात समावेश आहे. गणपतीवरील लेख, ग्रंथसंपदा, श्रीगणेश कोश असे विविध धार्मिक ग्रंथही त्यांच्या संग्रही आहेत. तसेच गणपतीच्या गाण्यांच्या शेकडो कॅसेट, सीडी त्यांनी जपून ठेवल्या आहेत. त्यांच्या संग्रहाची ख्याती एवढी झाली की, त्यांचे परिचित जेव्हा देश-विदेशात जातात तेथे त्यांना नवीन आकार, रूपातील गणेशाची मूर्ती दिसली की, ते खास घेऊन येतात व पटेल यांच्या संग्रहाला भेट स्वरूपात देऊन टाकतात. चारुलता पटेल २००४ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. त्या एवढ्या गणपतीमय झाल्या आहेत की, त्यांचा दिवस गणपतीसोबतच सुरू होतो आणि गणपतीचे ध्यान करीतच त्या झोपी जातात. त्यांनी आपल्या बंगल्यालाही ‘दूर्वांकुर’ असे नाव दिले आहे.
बंगल्याच्या अंगणात चोहोबाजूने त्यांनी झाडे लावली आहेत. ती सर्व गणरायाला आवडणारीच आहेत. गणेशमूर्तींना तर त्या पोटच्या मुलासारखे जपतात. बंगल्याच्या समोरील बाजूस त्यांनी स्वखर्चाने दूर्वांकुर गणपतीचे मंदिरही उभारले आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, मी गणपती भक्त होतेच, पण १९८२-८३ मध्ये रेल्वेतून प्रवास करीत असताना ५ रुपयांचे एक पुस्तक विकत घेतले. त्यात महाराष्ट्रातील १०८ गणपतींची माहिती होती. ते पुस्तक वाचून मला विविध ठिकाणची गणपती मंदिरे बघण्याचा व मूर्ती संग्रहित करण्याचा छंद लागला. आज माझे आयुष्यच गणपतीमय होऊन गेले आहे. गणपतीचे विपुल साहित्य आज माझ्या संग्रहात आहे. गणपती अभ्यासकांसाठी किंवा पीएच.डी. करणाऱ्यांसाठी हे संग्रहालय माहितीचा खजिनाच आहे.
दूर्वांकुर गणेश संग्रहालय
चारुलता पटेल यांनी सांगितले की, या बंगल्याचे रूपांतर भविष्यात दूर्वांकुर गणेश संग्रहालयात करण्याचा निर्णय मी घेतला आहे. आराध्यदैवत गणरायाबद्दल अशी विपुल माहिती असलेले स्वतंत्र संग्रहालय कुठेच नाही. गणेश अभ्यासक, भक्तांसाठी हे संग्रहालय सदैव खुले राहणार आहे. त्यादृष्टीने आता आखणी व नियोजन सुरू केले आहे.
मूर्तीचे विसर्जन नाही : चारुलता पटेल म्हणाल्या की, दरवर्षी गणेशोत्सवात विविध रूपांतील गणेशमूर्तींची स्थापना करते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी थोडे पाणी शिंपडून मूर्ती हलविते व ती संग्रहालयात ठेवते. तिचे विसर्जन करीत नाही.