सुंदर डीपी, मादक आवाज; भामट्याने महिलेच्या आवाजात बोलून वृद्धाकडून उकळले ३० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:49 PM2023-01-14T12:49:31+5:302023-01-14T12:50:53+5:30

सायबर पोलिसांनी सापळा रचून आरोपी पकडला 

Beautiful profile picture, intoxicating voice; 30 lakhs extorted from an old merchant by speaking in a woman's voice | सुंदर डीपी, मादक आवाज; भामट्याने महिलेच्या आवाजात बोलून वृद्धाकडून उकळले ३० लाख

सुंदर डीपी, मादक आवाज; भामट्याने महिलेच्या आवाजात बोलून वृद्धाकडून उकळले ३० लाख

googlenewsNext

औरंगाबाद : फेसबुकवर महिलेच्या नावाने बनावट खाते उघडून त्याद्वारे शहरातील एका प्रतिष्ठित वृद्ध व्यापाऱ्यास फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर चॅटिंगच्या माध्यमातून व्यापाऱ्यास सुंदर छायाचित्र पाठवून प्रेमाच्या गप्पा सुरू केल्या. त्यास व्यापारी बळी पडल्यानंतर आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगून विविध वेळी ३० लाख ४० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात पैसे घेण्यासाठी आलेल्या आरोपीस सापळा रचून पकडल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

संतोष सुरेश लोढा (३८, रा. गोदावरी कॉलनी, वैजापूर) असे महिलेच्या आवाजात बोलून फसविणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सायबर पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, शहागंज भागातील प्रसिद्ध व्यापारी नेमीचंद भुतडा (नाव बदलले आहे.) यांना विनल जैन नावाच्या महिलेची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. दोघे मित्र झाल्यानंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला. त्यातून मोबाइल क्रमांकांची देवाण-घेवाण केली. त्यानंतर व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू झाले. विनल हिने स्वत:चे सुंदर छायाचित्र नेमीचंद यांना पाठवले. त्याला भुलून नेमीचंद प्रेमात पडले. चॅटिंगनंतर मोबाइलवर बोलणेही सुरू झाले. काही न्यूड छायाचित्रांचीही देवाणघेवाण झाली. त्यानंतर विनलने, व्यापारात मला मोठा तोटा असून, त्यामुळे मला आत्महत्या करावी लागेल. तुम्ही मला आर्थिक मदत करा, अशी मागणी नेमीचंदांकडे केली. त्यांनी मदतीचे मान्य केल्यानंतर तिने माझा मावस भाऊ संतोष लोढा तुमच्याकडे पैसे घेण्यास येईल, असे सांगितले.

त्यानुसार ऑगस्ट २०२२ मध्ये लोढा हा नेमीचंद यांच्याकडून रोख ५ लाख रुपये घेऊन गेला. पुन्हा सप्टेंबर २०२२ मध्ये पुण्यात ७ लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा सतत भावनिक करीत ब्लॅकमेल करण्यात आले. तेव्हा लोढाच्या बँक खात्यात २० हजार रुपये पाठविले. यानंतरही ब्लॅकमेल करणे थांबले नाही. औरंगपुरा, गुलमंडी, शहागंजसह इतर ठिकाणी तब्बल १२ लाख २० हजार रुपये दिले. असे संतोष लोढा याच्याकडे एकूण २४ लाख ४० हजार रुपये देण्यात आले. ९ जानेवारी रोजी पुन्हा पैशांची मागणी केली. तेव्हा नेमीचंद यांनी पत्नीची ६ लाख रुपयांची हिऱ्याची बांगडी पुण्यात दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर अधिक तपास निरीक्षक प्रवीणा यादव करीत आहेत.

शहागंज परिसरात रचला सापळा
आरोपी संतोष हा हिऱ्याची बांगडी विकली जात नसल्यामुळे ती परत करून ३ लाख रुपये घेण्यासाठी गुरुवारी रात्री येणार होता. मात्र, तो आलाच नाही. शुक्रवारी सकाळी सहा वाजता तो नेमीचंदच्या शहागंज येथील घरी येणार होता. त्यानुसार सायबरच्या निरीक्षक प्रवीणा यादव, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, अंमलदार अमोल देशमुख, महेश उगले, जयश्री फुके, शाम गायकवाड, वैभव वाघचौरे, कल्पना जांबोटकर, राधा कालुसे, आयझॅक कांबळे, प्रवीण कुऱ्हाडे यांनी सापळा लावला. संतोषने नेमीचंदच्या घरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी झडप मारून त्यास पकडले. यादरम्यान उपायुक्त अपर्णा गिते पथकाच्या सतत संपर्कात होत्या.

मुलीच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस
फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याच्या उच्चशिक्षित मुलीला वडील तणावात असल्याचे लक्षात आले. तिने वडिलांना विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा वडिलांनी फसवणुकीची थोडीफार माहिती दिल्यानंतर तिने वडिलांना घेऊन थेट सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी पोलिसांनी व्यापाऱ्याचे समुपदेशन केले. त्यानंतर व्यापाऱ्याने सत्य परिस्थिती कथन केली. पोलिसांनी आरोपीकडून हिऱ्याची बांगडी, १६ हजार रोखसह मोबाइल जप्त केला.

 

Web Title: Beautiful profile picture, intoxicating voice; 30 lakhs extorted from an old merchant by speaking in a woman's voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.