आयुर्वेदिक डॉक्टरचा फौजदार झालो; पण उपअधीक्षकाच्या स्वप्नाने स्वस्थ बसू दिले नाही...
By सुमित डोळे | Published: May 16, 2024 04:38 PM2024-05-16T16:38:38+5:302024-05-16T16:48:11+5:30
माझा टर्निंग पॉईंट: पोलिस विभागात सामान्यांची थेट व तत्काळ सेवा करण्याची संधी मिळते, हे जवळून अनुभवले होते.
- डॉ. रणजित पाटील, सहायक पोलिस आयुक्त
बारावीनंतर धुळ्याच्या शिरपूर येथील आयुर्वेदाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध डॉ. कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळाला. खोलीवरचे दोन मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे. तेव्हा माझा अप्रत्यक्ष का होईना; स्पर्धा परीक्षेच्या तयारीशी संबंध येत होता. साताऱ्याला आयुर्वेदिकची प्रॅक्टिस सुरू असतानाच २०११ मध्ये उपनिरीक्षक तर २०१२ मध्ये एसटीआय उत्तीर्ण झालो.
अनेक जण पुढे महसूल व अन्य विभागांसाठी प्रयत्न करण्यास सांगायचे. परंतु पोलिस विभागात सामान्यांची थेट व तत्काळ सेवा करण्याची संधी मिळते, हे जवळून अनुभवले होते. त्यामुळे उपअधीक्षक होण्याचे स्वप्नाने स्वस्थ बसू दिले नाही. पोलिस अधिकारी असलेले वडील व सोबतच्या मित्रांमुळे पोलिस अधिकारी होण्याचे खरे वेड लागले व २०१४ मध्ये मी उपअधीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झालो.
१९७२ च्या दुष्काळात माझे वडील पोलिस विभागात रुजू झाले होते. पोलिस विभागाचे काम, समाजासाठी समर्पण, कष्ट लहानपणापासून जवळून पाहिले आहे. चौथीपर्यंत साताऱ्यात शिक्षण झाले. त्यानंतर वडिलांच्या बदलीप्रमाणे विविध ठिकाणी शिक्षण झाले. वडील पोलिस अधिकारी असले तरी आम्हा भावंडांना पोलिस अधिकारी बनण्यासाठी कधीही आग्रह केला नाही. अभ्यास करा. आदर, सन्मान मिळेल अशी नोकरी करा, चांगला माणूस व्हा, एवढेच ते सांगायचे. त्यामुळे मी माझ्या करियरचा मार्ग ठरवून डॉक्टर होण्याचे ठरवले होते. बारावीनंतर आयुर्वेदाचा चार वर्षे मन लावून अभ्यास केला. खोलीवरचे मित्र झपाटून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यांच्यासोबतच्या वाचनाने माझा अप्रत्यक्ष का होईना; स्पर्धा परीक्षेच्या तयारीशी संबंध येत होता. मी आयुर्वेदातच एम.डी करण्याचे ठरवले होते. मात्र, त्याच वर्षी अचानक एम. डी. च्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या. तेव्हा बराच तणावात होतो. परंतु आई-वडील सतत धीर देत होते.
बीएएमएस पूर्ण करून मी २००९ मध्ये साताऱ्याला प्रॅक्टिस सुरू केली. त्याच दरम्यान मी अधिकारी होण्याच्या मार्गावर वळलो होतो. त्यातही पाेलिसांनी ठरवले तर सामान्यांच्या आयुष्यात कमी वेळेत किती बदल घडवू शकतात, हे जवळून अनुभवले होते. २०११ मध्ये पहिल्याच प्रयत्नात उपनिरीक्षक, २०१२ मध्ये एसटीआय झालो. परंतु उपअधीक्षकाचे स्वप्न अस्वस्थ करत होते. त्यामुळे नोकरी करून अभ्यास सुरू ठेवला आणि २०१४ मध्ये स्वप्न पूर्ण केले
आजपर्यंतची सेवा
-२०१६ ते २०१८ - उपअधीक्षक, धानोरा, गडचिरोली.
-२०१८ -२० - उपविभागीय अधिकारी, रायगड.
-२०२० ते २३ -उपअधीक्षक, कराड.
-२०२३ पासून छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त.
उल्लेखनीय कार्य
-गडचिरोलीच्या पहिल्याच नियुक्ती दरम्यान एका गावात नक्षलवाद्यांकडून रात्रीतून गोळीबार सुरू झाला. आम्ही तेव्हा ठाण्यात होतो. सीआरपीएफचे जवान झुंज देत होते. आम्ही जंगलाच्या दिशेने निघालो. मध्यरात्रीतून अधिकची कुमक मागवावी लागली व पहाटेपर्यंत नक्षलवाद्यांनी पळ काढला.
-पुंडलिकनगर अतिक्रमण मोहिमेत दगडफेकीनंतर काही मिनिटात परिस्थिती नियंत्रणात आणून दोन दिवसात मोहीम फत्ते केली.
- कराड येथे विरोधी पक्षाच्या एका नेत्यांचे दोन मोठी आंदोलने कुशलतेने हाताळली.
गृहमंत्रालयाचे पदक:
-२०१९ मध्ये गडचिरोलीतील उल्लेखनीय सेवेसाठी राज्य सरकारचे खडतर सेवा पदक.
-२०२० मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आंतरिक सुरक्षा सेवा पदक प्रदान
आवडीचे छंद - वाचन, प्रवास.
आवडीचे लेखक- रणजित देसाई
आवडीचा खेळ - क्रिकेट व टेनिस.