काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे जिल्ह्यात सहमतीचे राजकारण मजबूत
By Admin | Published: January 29, 2017 11:48 PM2017-01-29T23:48:14+5:302017-01-29T23:52:30+5:30
लातूर :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी झाली असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले़
लातूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक असून दोघांचेही ध्येय एक आहे़ त्यामुळे मन आणि विचारांनी आम्ही एकत्र आलो आहोत़ विकासाचा अजेंडा अखंड ठेवण्यासाठी जिल्ह्यात सहमतीचे राजकारण आम्ही यापूर्वीही केले आहे आणि पुढेही करत राहू़ धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमची आघाडी झाली असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले़
स्थानिक स्वराज्य संस्था सक्षमपणे चालल्या पाहिजेत़ त्यामुळे या निवडणुकीत सक्षम उमेदवाराबरोबर चारित्र्यसंपन्न उमेदवार देण्यावर दोन्हीही पक्षांचा भर राहणार आहे़ जिल्ह्यात सहमतीच्या राजकारणाची परंपरा आहे़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ़ बाबासाहेब पाटील आणि मी जिल्हा परिषद, जिल्हा बँकेत गेल्या ३० वर्षांपासून काम करीत आहोत़ त्यामुळे आघाडी करणे सोपे झाले़ वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा करून ही आघाडी झाली आहे़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी यापूर्वी विधानसभा व लोकसभेसाठी झाली होती़ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पहिल्यांदाच आघाडी होत आहे़ तीही राज्यात सर्वप्रथम लातुरात आघाडी झाली आहे़ स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढलो होतो़ आता आघाडी झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर सहज काँग्रेस, राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही आ. दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला़ हल्ली निवडणुका विकास व कार्यक्रमांपेक्षा धर्म, संस्कृती आणि जाती-पातीवर होत आहेत़ ही चिंताजनक बाब आहे़ जाती-पातीच्या आणि धर्माच्या नावावर निवडणुका होत असल्याने दरी निर्माण होण्याची शक्यता आहे़ ही चुकीची प्रथा रोखण्याची जबाबदारी निधर्मी पक्षांवर आहे़ सर्वाधिक जबाबदारी काँग्रेस पक्षाची असल्याचेही आ़ दिलीपराव देशमुख म्हणाले़