दैव बलवत्तर होते म्हणून बिबट्याच्या हल्ल्यात बालक वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 02:10 PM2018-10-01T14:10:46+5:302018-10-01T14:15:45+5:30
भक्ष्याच्या शोधातील बिबट्याने खाटेवर झोपलेल्या बिबट्यावर उडी मारली अन् ...
सोयगाव (औरंगाबाद ) : भक्ष्याच्या शोधातील बिबट्याने उडी मारली अन् खाटेचे रूपांतर स्प्रिंगबोर्डात होऊन खाटेवर झोपलेले तीन वर्षांचे बालक उडून शेजारच्या नाल्यात पडले. बिबट्याची बालकावरील नजर हटली खरी; परंतु खाटेला बांधलेल्या शेळीवर ताव मारून तो तृप्त होत निघून गेला. शुभम पावरा सुखरूप बचावला असला तरी दूर फेकला गेल्याने जखमी झाला. कंकराळा गावानजीक रावेरी शिवारात रविवारी दुपारी हा थरार घडला.
रावेरी शिवारात गट क्र. ३८ मध्ये पावरा कुटुंब शेतमळ्ळातच राहते. शेतमळ्यातील झाडाच्या थंडगार सावलीत खाटेवर आईने ३ वर्षांच्या चिमुकल्या शुभमला झोपविले होते. कुटुंब शेतातील कामे करीत असताना कपाशीच्या शेतातून आलेल्या बिबट्याने अचानक बाजेवर झडप घातली. या झडपेमुळे खाटेचे दोर ताणले जाऊन त्याने स्प्रिंगसारखी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे खाटेवरील बालक उडून आठ ते दहा फूट दूरवर जाऊन पडले. बिबट्याच्या तावडीत बालकाऐवजी खाटेला बांधलेली शेळी आली. दूर व उंचावरून पडून शुभम जखमी झाला.
माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळावरून बिबट्याच्या पायाचे ठसे घेण्यात आले. आक्रमक बिबट्या नर असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.