दहा लाखात तलाठी व्हा! परीक्षा केंद्रातून १६ व्या मिनिटाला प्रश्नपत्रिका बाहेर,अर्ध्या तासांत उत्तरे
By सुमित डोळे | Published: September 7, 2023 05:10 PM2023-09-07T17:10:07+5:302023-09-07T17:11:46+5:30
९ वाजता परीक्षा सुरू, ९.१६ वाजता टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका, ९.४८ वाजता उत्तरे आली
छत्रपती संभाजीनगर : वनरक्षक पदाच्या परीक्षेत शहरात सहा घोटाळे समोर आले. आता तलाठी परीक्षेतही घोटाळेबाजांचे रॅकेट सक्रिय झाले असून थेट परीक्षा केंद्रातच उत्तरे पुरवली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राजू भीमराव नागरे (२९, रा. कातराबाद) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता चिकलठाण्यातील ईऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर तो परीक्षार्थीला उत्तरे पुरवण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांना रंगेहाथ सापडला. त्याचे तीन साथीदार मात्र पोलिसांच्या तावडीतून पळून गेले.
एमआयडीसी सिडकोचे उपनिरीक्षक आत्माराम घुगे, सचिन जाधव, अंमलदार संतोष सोनवणे, देविदास काळे, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड सोमवारी दुचाकी चोराच्या शोधात होते. साडेचार वाजता सदर केंद्राच्या बाहेरून जात असताना त्यांना चार तरुण संशयास्पदरीत्या दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता चौघांनी धूम ठोकली. राजू मात्र पथकाच्या हाती लागला. राजूच्या खिशात मास्टर कार्ड, दोन मोबाईल मिळाले. त्यातील टेलिग्रामवर तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे ३४ प्रश्नांचे छायाचित्र पाहून पोलिसांना धक्का बसला. आतील एका परीक्षार्थीला आम्ही उत्तरे पुरवल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
सकाळी यशस्वी, सायंकाळी अटक
-राजूने सकाळी ९ वाजेच्या परीक्षेत एका उमेदवाराला यशस्वीरीत्या उत्तरे पुरवल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. सायंकाळी ४ च्या परीक्षेतही तो उत्तर पुरवण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वी पोलिसांच्या हाती लागला.
-नऊ वाजता परीक्षा सुरू होताच अवघ्या १६ व्या मिनिटाला राजूच्या टेलिग्रामवर ३४ छायाचित्रांमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका आली होती. विजय पाटील नामक आरोपीने त्याला ९.४८ वाजता दोन कागदांवर संपूर्ण उत्तरे पाठवल्याचे आढळले.
अन् उपनिरीक्षक पद हुकले
बी. कॉम झालेल्या राजूने उपनिरीक्षकपदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली होती. मैदानी चाचणीच्या आधी त्याच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आणि त्याची संधी हुकली. त्यानंतर तो परीक्षा घोटाळ्याच्या रॅकेट मध्ये उतरला. दहा लाख रुपयांमध्ये त्याची टोळी उत्तरे थेट केंद्रात पुरवण्याचा दावा करतात. व्हॉट्सॲप चॅटिंग मध्ये त्याचा उलगडा झाला. ऑगस्ट महिन्यात वनरक्षक परीक्षेत सांगलीच्या घोटाळ्यात पोलिस त्याच्या शोधात होते. त्याच्यावर असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.