पालकत्व स्वीकारा ! किशोरवयीन अनाथांचे व्हा आई-बाबा, दत्तक घेण्याचा मार्ग झाला आता सोपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 05:06 PM2021-12-11T17:06:43+5:302021-12-11T17:08:17+5:30
Become a parent of a teenage orphan: साडेतेरा वर्षांचा मुलगा ठरला मराठवाड्यातील पहिला दत्तक
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : जन्मापासून अनाथाचा ठपका लागलेल्या किशोरवयीन मुला-मुलींना आता हक्काचे आई-बाबा मिळणार आहेत. कारण ७ ते १८ वर्षांपर्यंतच्या अनाथांना दत्तक घेण्याचा मार्ग सोपा झाला आहे (the way to adopt child has become easier now) . आता आयुष्यभर ‘कर्ण’ म्हणून या मुलांना जगावे लागणार नाही. याची सुरुवात साकार संस्थेतून झाली असून, साडेतेरा वर्षांच्या मुलाचा दत्तक देण्याचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे (Become a parent of a teenage orphan) . मराठवाड्यातील हा दत्तक जाणारा पहिला किशोरवयीन अनाथ ठरला आहे.
जुवेनाइल जस्टिह ॲक्ट (केअर ॲण्ड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन) अंतर्गत ० ते १८ वर्षांपर्यंतच्या अनाथ मुलांना दत्तक देण्याची पूर्वीपासूनच तरतूद आहे. मात्र, ६ वर्षांवरील अनाथ मुले-मुली बालगृहात, निरीक्षणगृहात असल्याने व या संस्थांना अनाथांना कायदेशीर दत्तक देण्याची परवानगी नसल्याने आजपर्यंत ही किशोरवयीन अनाथांना दत्तक देण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता नियम सोपे करण्यात आले आहेत. ज्या संस्थेला दत्तक विधानाची परवानगी आहे, अशा संस्थांद्वारे मान्यताप्राप्त बालगृह, निरीक्षणगृहातील मुला-मुलींना दत्तक देण्याचा मार्ग खुला झाला आहे.
दत्तक विधानाची परवानगी असणाऱ्या संस्था व बालगृहासारख्या संस्था यांच्यात ताळमेळ घडवून आणण्यासाठी सरकारने ‘व्हेअर आर इंडियाज् चिल्ड्रन’ या संस्थेची नेमणूक केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर मुंबई व औरंगाबादेत प्रकल्प राबविला जात आहे. मान्यताप्राप्त बालगृह, निरीक्षणगृहातील अनाथ मुला-मुलींची यादी तयार केली जात आहे. त्यातील काही मुलांची यादी शहरातील दत्तक विधानाची परवानगी असलेल्या ‘भारतीय समाजसेवा केंद्र’ व ‘साकार’ या संस्थांना देण्यात आली आहे. याद्वारे साडेतेरा वर्षांच्या एका अनाथ मुलाला दत्तक देण्याची कायदेशीर प्रक्रिया ‘साकार’ संस्थेेने पूर्ण केली आहे.
अनाथांचा शिक्का मिटणार
० ते १७ वयोगटांतील अनाथ बाळांना हक्काचे आई-बाबा मिळाले नाहीत. त्यांचा दत्तक जाण्याचा मार्गच बंद झाला होता. मात्र, आता जुवेनाइल जस्टिस ॲक्ट २०१८ मध्ये नवीन नियमाचा समावेश करण्यात आल्याने किशोरवयीन अनाथ मुला-मुुलींनाही दत्तक देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता अनाथ किशोरवयीन मुला-मुलींना हक्काचे आई-बाबा मिळतील. त्यांच्यावरील अनाथांचा शिक्का मिटेल.
- ॲड.अर्चना गोंधळेकर, कायदेशीर सल्लागार ‘साकार’
कोणाला घेता येईल दत्तक
१) किशोरवयीन मुला-मुलींना दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यांचे दोघांचे एकत्रित वयाची बेरीज ११०च्या आत असावे.
२) वडिलांचे वय ५५ पर्यंत तर आईचे वय ५४ पर्यंत असावे.
३) दत्तक घेण्यासाठी दाम्पत्यांना ‘सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ऑथोरिटी’च्या (सीएआरए) वेबसाइटवर नोंदणी करावी लागते.
४) सिंगल किंवा एकटी राहणारी महिला कोणत्याही लिंगाच्या मुला-मुलीला दत्तक घेऊ शकते.
५) सिंगल पुरुष केवळ मुलालाच दत्तक घेऊ शकतो.