कोरोना रुग्णांसाठी शहरामध्ये बेड्स उपलब्ध, पण पैसे मोजून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:02 AM2021-03-23T04:02:02+5:302021-03-23T04:02:02+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : शहरात व्हेंटिलेटर, आयसीयू बेडसाठी शासकीय रुग्णालय म्हणून रुग्णांना घाटी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाचाच आधार आहे. ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरात व्हेंटिलेटर, आयसीयू बेडसाठी शासकीय रुग्णालय म्हणून रुग्णांना घाटी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाचाच आधार आहे. महापालिकेच्या कोविड केअर सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणात खाटा उपब्ध आहेत, पण तेथे ऑक्सिजनची व्यवस्था नाही. शासकीय रुग्णालयांतील खाटांची क्षमता मर्यादित आहे. परिणामी, प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालये गाठावी लागत आहेत. खासगी रुग्णालयांत दहा दिवसांच्या उपचारापोटी ४० हजारांपासून दीड लाखांपर्यंतची रक्कम मोजावी लागत आहे.
शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांतील खाटा कोरोना रुग्णांनी फुल्ल झाल्या आहेत. कारण शासकीय यंत्रणेऐवजी कॅशलेश पाॅलिसी, इन्शुरन्स, जीवनदायी याेजना या मध्यमातून खासगी रुग्णालयांत उपचार घेण्यास प्राधान्य देणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक पाहायला मिळत आहे. खासगी रुग्णालयांत जनरल वाॅर्डात १० दिवसांच्या उपचारापोटी ४० ते ४५ हजार रुपये बिल होते. यात डाॅक्टरांचे राऊंड, औषधी, पीपीई कीट आदी खर्चाचा समावेश असतो. सेमी प्रायव्हेट रूमध्ये हाच खर्च ७५ हजारांपर्यंत जातो, तर आयसीयुपोटी एक ते दीड लाख रुपयांचे बिल होते. रुग्ण अधिक दिवस रुग्णालयांत राहिला, तर हा खर्चही वाढतो. मराठवाडा हाॅस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. हिमांशू गुप्ता म्हणाले, जीवनदायी योजना सुरू आहे. त्याचा लाभ देण्यासाठी रुग्णालये तत्पर आहेत. पण त्यातून फार काही साहाय्यता मिळत नाही, ही बाब लोकांना कळली आहे. त्यामुळे पैसे मोजून अनेक जण उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. शिवाय लोकांनी विमा काढला आहे. त्याचा फायदा घेऊन नागरिक उपचार घेत आहेत.
----
राखीव खाटा नावालाच
शहरात अनेक धर्मादाय रुग्णालयांत निर्धन रुग्णांसाठी केवळ नावालाच खाटा राखीव ठेवण्यात येत आहेत. गोरगरीब रुग्णांसाठीच्या राखीव खाटांचा पुरेसा वापरच होत नसल्याची परिस्थिती आहे. हीच परिस्थिती दुर्बल घटकातील रुग्णांच्या बाबतीतही पाहायला मिळत आहे. अशा रुग्णालयांत एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा या निर्धन रुग्णांसाठी, तर १० टक्के खाटा या दुर्बल घटकांतील लोकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. पण काही रुग्णालयेच या खाटांचा गोरगरीब रुग्णांना आधार देतात.
----
अशी आहे बेड्सची आकडेवारी...
कोरोना रुग्णांसाठी शहरात उपलब्ध खाटा
उपलब्ध- ५,७४३
रिकामे- ७८८
----------
शासकीय रुग्णालय
उपलब्ध- ३,२४९
रिकामे- ३७४
----
खासगी रुग्णालय
उपलब्ध- २,४९४
रिकामे- ४१४
---------
ऑक्सिजन
१) शासकीय रुग्णालय- ९१०
२) खासगी रुग्णालय- १२४८
३) रिकामे- १५५
---------
आयसीयु
१) शासकीय रुग्णालय- १०८
२) खासगी रुग्णालय- ३००
३) रिकामे- ७७
---
व्हेंटिलेटर आयसीयु
१) शासकीय रुग्णालय- ११७
२) खासगी रुग्णालय- १२६
३) रिकामे- ५२
------
खासगी रुग्णालयांत काय दर...
१) ऑक्सिजन- ४ हजार रुपये
२) आयसीयु- ७ हजार ५०० रुपये
३) व्हेंटिलेटर आयसीयु- ९ हजार रुपये