प्रवेशबंदीचा वेळ संपताच बीड बायपास बनला अधिक धोकादायक; पुढे जाण्यासाठी जडवाहनचालकांमध्ये लागली स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 02:10 PM2018-09-04T14:10:23+5:302018-09-04T14:23:31+5:30
बीड बायपासवरील प्रवेशबंदीचा वेळ संपताच ट्रक, हायवासह अन्य अवजड वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरू होते.
औरंगाबाद : बीड बायपासवरील प्रवेशबंदीचा वेळ संपताच ट्रक, हायवासह अन्य अवजड वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरू होते. अन्य वाहनचालकांसाठी ते रस्ताच सोडत नसल्याने या मार्गावरील अपघाताचा धोका वाढल्याचे सोमवारी दिसून आले. विशेष म्हणजे बायपासवरील सुसाट राँगसाईड वाहनचालकांची संख्या ‘जैसे थे’ आहे.
बीड बायपासवर महिनाभरात अपघातात पाच जणांचे बळी गेले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी २ ते ९ सप्टेंबरदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर जडवाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत प्रवेशबंदी केली. प्रवेशबंदीच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ८ ते ११ पर्यंत दोन्ही बाजूंनी पोलिसांनी अवजड वाहने रोखली. ११ वाजेनंतर जडवाहनांसाठी मार्ग खुला होताच जडवाहनचालकांनी वाहने वेगात दामटली. या रस्त्यावरील दोन्ही लेनचा ताबा घेत जडवाहनचालकांमध्ये पुढे निघण्याची स्पर्धाच सुरू झाली.
या स्पर्धेत जडवाहनचालक अन्य वाहनांसाठी लेनच शिल्लक ठेवत नाही, परिणामी दुचाकीस्वार आणि कार, रिक्षासारखे छोटे वाहनचालक जीव धोक्यात घालून दोन वाहनांमधील अरुंद फटीतून पुढे निघण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सोमवारी सदर प्रतिनिधीला आढळले. बीड बायपास रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन केल्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर यांनी रविवारी आणि सोमवारीही बायपासची पाहणी केली. वाहतूक व्यवस्थेत काय फरक पडला, तेथील बेशिस्त आणि राँगसाईड वाहनचालकांवर कारवाईचे आदेश त्यांनी पोलीस निरीक्षकांना दिले. यावेळी पोलीस निरीक्षक भारत काकडे, अशोक मुदिराज आणि हेमंत गुरमे यांची उपस्थिती होती.
दोन्ही बाजूने दुपारी अडीचपर्यंत वाहनांच्या रांगा
सकाळी रोखलेली वाहतूक पुढे बीड बायपासवरून जाण्यासाठी तब्बल तीन तास लागले. झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम चौक आणि लिंक रोड ते झाल्टा फाटा या दोन्ही मार्गांवर सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत जडवाहने रांगेत धावत होती. तेव्हा दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून वाहने चालवीत होते. २ वाजेनंतर बीड बायपासवरील जडवाहनांची संख्या कमी झाली. मग रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
राँगसाईड सुसाट
बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र अधिसूचना काढून जडवाहनांना प्रवेशबंदी केली. असे असताना या मार्गावरील राँगसाईड वाहने पळविणाऱ्यांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट राँगसाईड सुसाट वाहने पळविणाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. यात रिक्षाचालक, दुचाकीचालकांसोबत चारचाकी कारचालकही दिसले. राँगसाईड वाहनचालकांवर सकाळी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
वेग कमी करण्यासाठी लावले बॅरिकेडस्
बीड बायपासवर ठिकठिकाणी बॅरिकेडस् लावले आहेत. यामुळे वाहनचालकांना वेग कमी करून झिग-झॅग पद्धतीने वाहन पुढे न्यावे लागते आणि अपघात टळतो. अपघातप्रवण ठिकाणीच हे बॅरिकेडस् लावण्यात आले.
- भारत काकडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.