चार उड्डाणपुल उभारून बीड बायपासचे होणार सहापदरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 07:58 PM2020-03-18T19:58:29+5:302020-03-18T20:01:34+5:30
औरंगाबादेतील कंत्राटदार संस्थेला कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे.
- विजय सरवदे
औरंगाबाद : मृत्यूचा सापळा ठरलेला बीड बायपास आता सर्व्हिस रोडसह सहापदरी होणार आहे. विशेष म्हणजे, केम्ब्रिज शाळा ते महानुभाव आश्रमापर्यंत ठिकठिकाणी चार उड्डाणपुलांची उभारणी केली जाणार असून, सध्या यासाठी भूगर्भ चाचणीचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अपघात थांबण्याची अपेक्षा आहे.
राज्य शासनाने या कामासाठी निधीदेखील मंजूर केला. बीड बायपास रस्त्याचा प्रकल्प ३८३ कोटींचा आहे. त्यापैकी ३०६ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाच्या नियंत्रणाखाली या रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार असून, औरंगाबादेतील कंत्राटदार संस्थेला कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. या संस्थेने आता रस्ता रुंदीकरणाच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.
केम्ब्रिज शाळा ते झाल्टा फाटा व झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम, असा एकूण १७ किलोमीटर लांबीच्या बायपासवर वर्दळीच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सध्या भूगर्भ पातळीच्या चाचण्या घेतल्या जात असून, रस्ता रुंदीकरणाच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडसह केम्ब्र्रिज शाळा ते झाल्टा फाटा हा चार पदरी रस्ता तयार केला जाणार आहे, तर झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम सहा पदरी रस्ता केला जाणार आहे. संबंधित कंत्राटदाराला दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे, असे जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत बायपास रस्त्यावर झालेल्या अपघातात शंभराहून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर बायपास रस्त्याच्या रुंदीकरणाचा मुद्दा गाजला. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोडवर अतिक्रमणे झाल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला. त्यात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. परिणामी, विभागीय आयुक्तांनी बीड बायपास रस्त्यावर सर्व्हिस रोड का नाही, असा मुद्दा उपस्थित करीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आणि तेथून पुढे मग या रस्त्यावरील अतिक्रमणे पाडण्याच्या मोहिमेने गती घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव शासनाला पाठविला. अलीकडेच स्थानिक आमदाराने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पाठपुरावा केला होता.
कुठे उभारणार उड्डाणपूल
बीड बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. अलीकडे जुने औरंगाबाद, तर पलीकडे नवीन वसाहती वाढल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी केम्ब्रिज शाळेजवळ, देवळाई चौक, संग्रामनगर उड्डाणपुलाचा रस्ता बायपासला मिळतो तिथे आणि एमआयटी कॉलेजसमोर उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. याशिवाय महानुभाव आश्रमाजवळ जंक्शन पॉइंट तयार केला जाणार आहे, असे जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता भंडे यांनी सांगितले.