‘श्रीं’च्या पालखीने बीड भक्तिमय
By Admin | Published: July 17, 2017 12:41 AM2017-07-17T00:41:53+5:302017-07-17T00:42:20+5:30
बीड : आषाढी एकादशीनंतर पंढरपूर येथून शेगावकडे परतणारी संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी बीड शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आषाढी एकादशीनंतर पंढरपूर येथून शेगावकडे परतणारी संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी बीड शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. परंपरेप्रमाणे विठ्ठल मंदिरात पूजेनंतर पालखी कनकालेश्वर मंदिर परिसरात विसावली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी घरासमोर
महिला भाविकांनी काढलेल्या आकर्षक रांगोळीने लक्ष वेधले. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविकांनी श्रींचे शिस्त व शांततेत दर्शन घेतले.
सकाळी बार्शी रोड येथून सोमेश्वर मंदिरमार्गे शिवाजी चौकात पालखीचे आगमन झाले. त्या भागातील भाविकांनी उत्साहाने पालखीचे दर्शन घेत सेवा दिली. शिवाजी चौक, पशीरगंज, कारंजा, बलभीम चौक, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, नवा पूल, डॉ. आंबेडकर चौकातून पालखी बालाजी मंदिराच्या सभागृहात पोहोचली. तेथे व्यापारी मंडळातर्फे वारकऱ्यांसाठी भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर पालखी संस्थान विठ्ठल मंदिरात पोहोचल्यावर तेथे प्रति वार्षिक परंपरेनुसार श्रीं ना नैवैद्य पूजन तसेच आरती करण्यात आली.
दरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना फराळ व उपयोगी साहित्यांचे वाटप स्थानिक भाविकांनी केले. कनकालेश्वर मंदिरात पालखी आगमनानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. आंधळकर परिवार आणि भक्त मंडळींच्या वतीने वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तर रात्री एकनाथ महाराज पुजारी यांच्या कीर्तनानंतर सोमवारी पहाटे पाच वाजता पालखीचे जालन्याकडे प्रस्थान होणार आहे.
पालखी सोबत शेगाव ते पंढरपूर आणि परतीच्या प्रवासात खेळणी विक्रेत्यांची जत्रा असते. बच्चे कंपनीला आकर्षित करणारे पावा, फुगे, खेळणी हातगाड्यावर विकणारे पन्नासपेक्षा जास्त विक्रेते यात सहभागी असतात. त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्यही असतात. यातून त्यांना चांगला रोजगार मिळतो.