बीड जिल्हा- कलावंतांचा बालेकिल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:18 AM2017-10-14T00:18:30+5:302017-10-14T00:18:30+5:30
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड व कै. किसनराव राऊत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त समता महाकरंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी थाटात झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्ह्यात कलावंतांची खाण आहे. राज्यातच नव्हे तर देशात बीडच्या कलाकारांनी झेंडा फडकावला आहे. कलावंतांचा बालेकिल्ला अशी बीड जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे. ही गोष्ट बीडकरांसाठी अभिमानाची आहे, असे प्रतिपादन आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड व कै. किसनराव राऊत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त समता महाकरंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी थाटात झाले. यावेळी आ. क्षीरसागर बोलत होते.
व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, आयोजक अॅड. सुभाष राऊत, अभिनेता सुरेश विश्वकर्मा, सुरेखा कुडची, नम्रता संभेराव, भरत लोळगे, राजाभाऊ शेळके, गोपाळ लड्डा आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुभाष राऊत यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी मागील सात वर्षांपासून या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेतून दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने बीडकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळत आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांना करिअरच्या दिशेने जाण्याचा मार्ग मिळाला आहे. त्यामुळे ही स्पर्धा कलावंतांसाठी दिशादर्शक ठरत असल्याचे अॅड. राऊत म्हणाले.
मेघराज राजेभोसले म्हणाले, समता महाकरंडक ही स्पर्धा कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धांचे आयोजक होणे गरजेचे आहे. उपस्थित इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करून एकांकिका सादर करणाºया स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजक, संयोजक, मान्यवरांसह रसिक प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.