जिल्ह्यातील जलसाठ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:58 AM2017-07-31T00:58:10+5:302017-07-31T00:58:10+5:30
बीड जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे मे अखेरनंतर प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी आहे तो पाणीसाठी तब्बल १५ टक्क्यांनी घटला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे मे अखेरनंतर प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी आहे तो पाणीसाठी तब्बल १५ टक्क्यांनी घटला आहे. मे अखेर १४४ जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा २९.७१ टक्के इतका होता. हा पाणीसाठा सद्यस्थितीत १५.७५ टक्क्यांवर आला आहे. पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील जलसाठे अद्यापही तहानलेलेच आहेत.
जिल्ह्यात माजलगाव व मांजरा असे दोन मोठे, १६ मध्यम तर १२६ लघु असे एकूण १४४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ही ११३५.२३२ दलघमी इतकी असून एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ८८८.७३६ दलघमी इतकी आहे.
या प्रकल्पांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठवण क्षमतेच्या तुलनेत आजघडीला अर्धा पावसाळा संपत आला असताना फक्त १३९.९६२ दलघमी म्हणजेच १५.७५ टक्के इतका पाणीसाठा शेष राहिला आहे. मे अखेर माजलगाव धरणात ३५.८०० दलघमी इतका म्हणजेच २१.०९ टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक होता तर मांजरा धरणात ५२.८० दलघमी म्हणजेच २९.७१ टक्के इतका साठा उपलब्ध होता.
आजघडीला माजलगाव धरणात केवळ १३.१४ टक्के तर मांजरा धरणात २२.८६ टक्के पाणीसाठा राहिला आहे. अर्धा पावसाळा संपत असताना जिल्ह्यातील १४४ पैकी ७ प्रकल्प कोरडेठाक असून तब्बल ६८ प्रकल्पांमधील पाणी जोत्याखाली गेले आहे.
सध्या १३ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी उपलब्ध आहे. याशिवाय १५ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्क्यांदरम्यान, ४ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान तर फक्त एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी उपलब्ध असल्याची नोंद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अहवालात घेण्यात आली
आहे.