बीडमध्ये पाणी झाले लाखमोलाचे !
By Admin | Published: June 2, 2014 12:04 AM2014-06-02T00:04:48+5:302014-06-02T00:49:59+5:30
सोमनाथ खताळ , बीड बीड न.प.कडून आठवड्याला पाणी दिले जात असल्याने शहराला टंचाईचा सामना करावा लागतो. यातच शासकीय, निमशासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचे जार आणले जातात.
सोमनाथ खताळ , बीड बीड न.प.कडून आठवड्याला पाणी दिले जात असल्याने शहराला टंचाईचा सामना करावा लागतो. यातच शासकीय, निमशासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचे जार आणले जातात. मात्र आणलेल्या जारमधील पाण्याची शुद्धता आहे का? हा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान, बीडमध्ये पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत असून, रोजची उलाढाल ४५ लाखांच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे. शहरात सध्या विविध भागात १० ते १५ खाजगी पाणी शुद्धीकरणाचे कारखाने आहेत. यातील अनेकांना पाणी विकण्याचा परवाना सुद्धा नाही. परवाना नसतानाही हे व्यावसायिक आपला पाणी विक्रीचा व्यवसाय खुलेआम चालवित आहेत. परंतु खरे म्हणजे या कारखान्यांमधून जे शुद्ध पाणी विक्रीसाठी आपल्याला विकत दिले जाते, ते खरेच शुद्ध आहे का? त्या पाण्यावर योग्य प्रक्रिया केली आहे का? याची कोणीही खातरजमा न करताच बिनधास्तपणे पाणी विकत घेऊन पितात. परवाना काढणे गरजेचे कोणतेही खाद्य पदार्थ अथवा वस्तू विकायची असेल तर त्यासाठी संबंधित विभागाकडून परवाना काढणे आवश्यक असते. मात्र बीडमधील एक दोन वगळले तर कोणाकडेच पाणी विक्रीचा परवाना नाही, अशी धक्कादायक माहिती आहे. पाण्यातून पैसा कमविण्यासाठी अनेकांनी विना परवाना कंपन्या उघडल्या आहेत. गैरप्रकारास जबाबदार कोण? हे पाणी विक्रेते पाण्यावर योग्य ती प्रक्रिया न करताच पाणी विक्री करतात. यातील काही कारखानदार पाणी शुद्ध करण्यासाठी विविध प्रकारचे औषध वापरतात. मात्र हे औषध पाण्यात टाकले की, पाणी कडसर लागते, असा अनुभवही काही लोकांनी सांगितले. तर काही जण या पाण्याला केवळ फिल्टर करून थंड करतात व ते विकतात. मात्र या पाण्यापासून एखादा आजार झाला अथवा एखाद्याच्या जीवितास धोका पोहोचला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत अन्न, औषध प्रशासन अधिकारी डी.जी. वीर म्हणाले, पाणी विक्रेत्यांना परवाना देण्याचा अधिकार आम्हाला नाही, आम्ही केवळ बाटली बंद पाणी विक्रेत्यांनाच परवाने देतो. स्पर्धक वाढल्यामुळे भाव कमी एका पाणी विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, आम्ही पाणी शुद्धतेवर भर देतो. पाणी शुद्ध झाले की नाही हे पाहण्यासाठी ते लॅबला पाठविले जाते त्यानंतरच ते ग्राहकाला दिले जाते. पूर्वी एका जार चा भाव ४० ते ५० रूपये होता आता स्पर्धक वाढल्यामुळे यामध्ये घट झाली असून हे भाव आता ४० ते २० रूपयापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. विनापरवाना पाणी विक्रेत्यांमुळे हे भाव कमी करावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालये, व्यापार्यांनी लावला रतीब शहरात याबाबत सर्वेक्षण केले असता, जास्तीत जास्त पाणी विकत घेणार्यांची संख्याही कार्यालये आणि छोट्या- व्यापार्यांचीच आहे. ४० टक्के कार्यालये आणि ४० टक्के व्यापारी असे पाणी विकत घेत असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारीवरून समोर आले आहे. तर इतर २० टक्के हे लग्न सोहळा, इतर कार्यक्रम व घरी पिण्यासाठी विकत घेत आहेत. पाण्यासाठी ‘अॅडव्हान्स बुकींग’ आपल्याकडे एखादा घरगुती कार्यक्रम, लग्न सोहळा आदी कार्यक्रम असतील तर या पाण्याची दोन दिवसा अगोदरच बुकींग करून ठेवावी लागते. ऐन वेळेला हे पाणी मिळत नाही. अनेकदा ग्राहकांची अडचण ओळखून जास्तीचा भाव सांगितला जातो. थंडावा संपला की बदलते चव ज्या दिवशी पाणी थंड आहे, त्यादिवशी हे पाणी पिण्यासाठी चांगले लागते. मात्र या पाण्यातील थंडावा निघून गेला की, हे पाणी कडसर लागते व त्याचा वासही येत असल्याच्या प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या.