बीड अवैध गर्भपात प्रकरण; एजंट अंगणवाडी सेविकेकडे सापडले २९ लाख, पाचजणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 11:37 AM2022-06-08T11:37:01+5:302022-06-08T11:46:48+5:30
पोलिसांनी एजंट मनिषाची घराची मंगळवारी रात्री झडती घेतली. यात रोख २९ लाख रूपये सापडले आहेत.
- सोमनाथ खताळ
बीड : अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि एजंट असलेल्या अंगणवाडी सेविकेकडे ५००, २ हजार रूपयांचे नोटांचे बंडल सापडले आहेत. ही रक्कम जवळपास २९ लाख रूपये आहे. तसेच जमीन, कोट्यावधींचे बंगलेही तिच्या नावावर आहेत. एजंटांकडे एवढे पैसे म्हणल्यावर मुख्य सुत्रधाराकडे किती असतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, याप्रकरणात पाच जणांविरोधात रात्री उशिरा पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सीताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे (वय ३०, रा. बक्करवाडी, ता. बीड) या महिलेचा ५ जून रोजी मृत्यू झाला होता. शीतल यांना अगोदरच तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या; परंतु रविवारी अचानक त्यांना रक्तस्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी पती, सासरा, भाऊ, मनिषा सानप नावाची अंगणवाडी सेविका, लॅबवाला, नर्स यांना ताब्यात घेतले आहे.
बीडमध्ये अवैध गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू; पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना घेतले ताब्यात
दरम्यान, पोलिसांनी एजंट मनिषाची घराची मंगळवारी रात्री झडती घेतली. यात रोख २९ लाख रूपये सापडले आहेत. तसेच खोके, कॉट, पर्स, डब्बे, कपाट आदी ठिकाणी ५०० ते २ हजार रूपयांच्या नोटांचे बंडल निघत होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणाचा तपास आणखी सुरूच असून आरोपींची साखळी वाढण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी; बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात
या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती गणेश गाडे, सासरा सुंदरराव गाडे, भाऊ नारायण निंबाळकर, अंगणवाडी सेविका मनिषा सानप, नर्स सीमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव ढाकणे यांनी यात फिर्याद दिली आहे.