बीड, माजलगाव जाळपोळ पूर्वनियोजित नव्हती, असंतोषाचा उद्रेक झाला: ज्ञानेश्वर चव्हाण
By सुमित डोळे | Published: December 30, 2023 06:22 PM2023-12-30T18:22:18+5:302023-12-30T18:23:49+5:30
विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पहिल्यांदाच व्यक्त केले स्पष्ट मत, अंतरवाली सराटीची घटना पोलिसांसाठी एक केस स्टडी, मनोधैर्य कमी होऊ देणार नाही; अनुभवातून शिकू
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदाेलनादरम्यान बीड, माजलगाव येथे लोकप्रतिनिधींच्या घरावरील हल्ले आणि जाळपोळ या घटना पूर्वनियोजित कटाचा भाग नसावा. शिक्षण, नोकरीमुळे मनात असंतोष असलेले तरुण दंगेखोरांसमवेत सहभागी झाले व पुढे उद्रेक झाला असावा. ती एक तात्कालिक प्रतिक्रिया होती, असे स्पष्ट करत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केले. ही घटना पोलिस विभागासाठी एक केस स्टडी असून, यातून खूप काही शिकून आम्ही सकारात्मकतेने वाटचाल करू. या सर्व घटना घडल्या असल्या तरी पोलिसांचे मनाधैर्य मात्र खचू देणार नाही, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी बुधवारी ‘लोकमत’ला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत कॉफीटेबल’ या उपक्रमांतर्गत संपादकीय विभागाच्या सहकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी पोलिस विभागाच्या समस्यांवरही प्रकाश टाकला.
ऑगस्टमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनास सुरुवात झाली. त्यानंतर अंतरवाली सराटीसह जालना, बीड जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडल्या. लाठीचार्ज, आंदोलने, जाळपोळ, लाखोंच्या सभा पार पडल्या. अनेक पोलिस गंभीर जखमी झाले. वरिष्ठ पोलिस अधिकारी निलंबित झाले. या सर्व घडामोडींवर बोलताना डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, पाेलिस सेवेत असे अनुभव येत असतात. बीडमधील आंदोलनात ९० टक्के तरुण हे २० ते ३० वयोगटातील आणि स्थानिक आहेत. त्या परिसरात कायम विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांची उपस्थिती असते. नोकरीचा अभाव आणि शिक्षणातील अडचणी यामुळे या तरुणांचा उद्रेक झाला असावा.
१. आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी होतेय. ते शक्य आहे का?
- बीड, माजलगाव जाळपोळीत जवळपास पावणेतीनशे आरोपी आहेत. अटकेतील सर्व आरोपींविरोधात सीसीटीव्ही फूटेज व अन्य तांत्रिक पुराव्यांचे सबळ पुरावे आहेत. या प्रकरणी एसआयटीचा अहवालही वरिष्ठांसह गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे.
२. अटकसत्र सुरू राहील का?
- हो. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांमध्ये तिघांना अटक आहे. जाळपोळ, तोडफोडीचा तपास अद्यापही सुरू आहे. आरोपी निष्पन्न करून शोध सुरू आहे.
३. मुंबईतील नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई होत असल्याच्या आरोपात तथ्य आहे का?
- एकूणच कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत. आंदोलनात चुकीचे घटक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.
प्रश्न- पोलिस वेळेवर पोहोचले नसल्याचा आरोप होतोय?
- असे नाही. आंदोलन हिंसक होईल, असे अपेक्षितच नव्हते. अन्य ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनामुळे आमचा फोर्स विखुरला गेला होता.
प्रश्न- लाठीचार्जविषयी गैरसमज आहेत, असे दिसत आहे..
- अंतरवाली सराटी आंदोलनात मनोज जरांगे यांनी आधी रुग्णालयात येण्याची तयारी दाखविली. त्यांना नेण्यासाठी पोलिस तेथे गेले होते. पोलिसांनी जाणीवपूर्वक लाठीचार्ज केला नाही. रुग्णालयात नेताना गैरसमज झाले. त्यातून दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटली. अनेक पोलिस विनाहेल्मेट होते. त्यातून बचावात्मक पद्धतीने लाठीचार्ज झाला. यात आमचे १७ पेक्षा अधिक पोलिस, महिला पोलिस जखमी झाले.
निलंबनामुळे पोलिसांचे मनोधैर्यही खचले?
- प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतात तसेच पोलिस विभागातही येतात. मनोधैर्य वाढवून आमची सकारात्मकतेने वाटचाल सुरू असते. असे प्रसंग कर्तव्याचा भाग असतात. आम्ही सकारात्मकतेने वाटचाल करू.
- छत्रपती संभाजीनगरच्या पुढील पोलिस आयुक्तपदासाठी तुमच्या नावाची चर्चा आहे. तुम्ही इच्छुक आहात का?
-हा शासनस्तरावरील निर्णय आहे. मी शहरात साडेतीन वर्षे काम केले आहे. त्यातून शहराविषयी एक वेगळी आपुलकी, अनुभव आला आहे.