बीड पालिकेत ‘मन का राज’!
By Admin | Published: June 20, 2017 11:46 PM2017-06-20T23:46:28+5:302017-06-20T23:50:21+5:30
बीड : बीड नगरपालिकेत सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.
सोमनाथ खताळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड नगरपालिकेत सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. बायोमेट्रीक नसल्याने उशिरा यायचे आणि लवकर निघून जायचे, असा काहिसा प्रकार पहावयास मिळत आहे. हाच धागा पकडून मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ‘लोकमत’ने स्टींग केले. यावेळी बहुतांश विभागातील अधिकारी, कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यांच्या रिकाम्या खुर्च्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्या. कार्यालयीन वेळेत दांडी मारत ‘मन का राज’ चालविणाऱ्यांना अभय कोणाचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बीड पालिकेतील ‘राजकारण’ गाजत आहे. त्यामुळे पालिका नेहमीच चर्चेत असते. पालिकेतील ठराविक कर्मचाऱ्यांचेही गट पडले आहेत. मुख्याधिकारी नियमित नाहीत. याचाच फायदा घेत पालिकेतील विभाग प्रमुखांसह कर्मचारी सर्रासपणे कार्यालयातून दांडी मारत आहेत. कार्यालयीन वेळेत न येता उशिरा येणे. सायंकाळी लवकर जाणे. एखाद्याने विचारले तर ‘आम्हाला फिल्ड वर्क’ला जावे लागते, असे कारण सांगून वेळ मारून नेली जाते. अशा या कारणांना आणि दांडीबहाद्दरांमुळे पालिकेतील नियोजन बिघडले आहे. कोणाचा कोणावर वचक राहिलेला नाही. जो तो मनमानी कारभार करीत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
एखादी स्वाक्षरी घ्यायची असेल किंवा तक्रार करायची असेल तर त्यांना अधिकाऱ्यांना सापडण्याची वेळ येत आहे. अशा या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बांधकाम विभागात केवळ एक लिपिक हजर होते. इतर अधिकारी गायब होते. पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता राहुल टाळके कामात व्यस्त होते. तर बाहेर एक महिला लिपिक काम करीत होत्या. इतर सर्व कर्मचारी गायब होते. नगर रचना विभागात वेळेवर काम होत नसल्याने अधिकारी, कर्मचारी यांच्यात वादावादी सुरू होती. केवळ दोन ट्रेसर उपस्थित होते. सुवर्ण जयंती विभागात प्रकल्प अधिकारी कुरेशी हे कामात व्यस्त होते. इतर कर्मचारीही काम करताना दिसून आले. वरिष्ठ लिपिक हे कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगण्यात आले.
वसुली विभागात कर अधीक्षक इद्रीस हे उपस्थित होते. परंतु त्यांच्या विभागातील पाच ते सहा टेबल रिकामे होते. रिकाम्या खुर्च्या पंख्यांची हवा खात होत्या. तर समोर नागरिक त्यांची प्रतीक्षा करीत बसल्याचे दिसून
आले.