पाच मिनिटे थांबले बीड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:56 AM2017-09-27T00:56:06+5:302017-09-27T00:56:06+5:30
सायंकाळची वेळ...कामे आटोपून सर्वांनाच घराकडे जाण्याची ओढ... रस्त्यांवर वाहनांची गर्दी, अशा परिस्थितीतही तब्बल ५ मिनिटे बीड शहर थांबले तर मिनिटभर स्तब्ध झाले.
सोमनाथ खताळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सायंकाळची वेळ...कामे आटोपून सर्वांनाच घराकडे जाण्याची ओढ... रस्त्यांवर वाहनांची गर्दी, अशा परिस्थितीतही तब्बल ५ मिनिटे बीड शहर थांबले तर मिनिटभर स्तब्ध झाले. मागे-पुढे पोलिसांच्या गाड्यांचा ताफा असलेली अवयव घेऊन जाणारी जीप पापणी लवण्यापूर्वीच वायूवेगाने बीड शहरातून सुखरुप बाहेर पडली. यासाठी प्रयत्न केले ते बीड पोलिसांनी. चौका-चौकात, फुटा-फुटावर पोलिसांचा फौजफाटा वाहतूक अडवून या वाहनासाठी वाट मोकळी करुन देत होता. दोन मिनिटे स्तब्ध थांबलेल्या बीडकरांनी ‘थँक्यू बीड पोलीस’ म्हणून ‘सलाम’ केला. पोलिसांनीही बीडकरांना धन्यवाद दिले.
बीड : लातूर येथील किरण सुनील लोभे (१९) या तरुणाला १५ सप्टेंबर रोजी विजेचा धक्का लागला होता. त्यामुळे तो छतावरुन खाली पडला. यामध्ये जखम होऊन त्यांच्या मेंदूला इजा झाली. २५ सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी त्याचा मेंदू मृत घोषित केला. त्यानंतर नातेवाईकांना बोलावून घेत अवयवदानाचे महत्व पटवून दिले.
सर्वांची संमती मिळाल्यानंतर किरणच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये किरणचे हृदय विमानातून मुंबईला तर दोन्ही किडन्या जीपमधून (एमएच२०/सीएच ९७४३) औरंगाबादला नेण्यात आल्या. तत्पूर्वी किरणचे अवयव घेऊन जाणाºया जीपला लातूर ते औरंगाबाद दरम्यान कोठेही अडथळा येणार नाही, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.
बीड व लातूर जिल्ह्याच्या सीमेवर बीड पोलिसांच्या वाहनांचा ताफा जीपच्या प्रतीक्षेत होता. दूरवर लाल रंगाची जीप दिसताच त्यांनी आपली वाहने वायू वेगाने बीडकडे मार्गस्थ केली. येण्यापूर्वीच पोलिसांनी सर्व वाहतूक ठप्प केली. रात्री ८ च्या सुमारास ही जीप खजाना विहिरीजवळ आली त्याचवेळी कंट्रोल रुमला पोलिसांनी माहिती देऊन बार्शी नाक्यावरील वाहतूक थांबवली. वायूवेगाने येणारी जीप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आली आणि क्षणार्धात औरंगाबादकडे मार्गस्थ होत दिसेनासी झाली.
अविस्मरणीय क्षण
जीप मार्गस्थ होण्यासाठी जेवढे लोक थांबले होते, ज्यांनी ही वायूवेगाने जाणारी जीप पाहिली व वाहतूक थांबविण्यासाठी पोलिसांनी केलेले प्रयत्न नजरेने पाहिले, त्यांच्यासाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला, असे म्हटले तर वावगे ठरू नये.