मातृ वंदना योजनेत राज्यात बीड अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:57 PM2019-07-13T12:57:13+5:302019-07-13T13:16:36+5:30
पहिल्यांदा गर्भवती राहिलेल्या मातेला या योजनेचा लाभ दिला जातो.
बीड : प्रधानमंत्री मातृ वंदना योजन प्रभावीपणे राबवून महिलांना लाभ देण्यात बीड जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. ५० पैकी ४१ गुण बीड जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. सांगली जिल्हा द्वितीय तर, अहमदनगर जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी हे गुणांकन करून बीड जिल्ह्याचा शुक्रवारी सन्मान केला.
पुणे येथे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा आढावा डॉ. अर्चना पाटील यांनी घेतला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक या कार्यक्रमाला उपस्थित होते. एकुण लाभार्थी, वाटप झालेला निधी आणि कमी त्रुटी आढळल्यामुळे बीड जिल्ह्याला ५० पैकी ४१ गुण मिळाले. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ३६७ लाभार्थ्यांना ११ कोटी ३६ लाख रूपये वाटप करण्यात आले आहेत. बीड पाठोपाठ सांगली ३५ गुण, अहमनगर ३१, भंडारा २७ वा क्रमांक लागतो.
यानंतर प्रत्येक तीन महिन्याला कुटूंब कल्याण कार्यालयाकडून या योजनेचा आढावा घेतला जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रथम क्रमांक मिळाल्याने बीड आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून यापुढेही विभाग चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. योजना यशस्वी करण्यासाठी सीईओ अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा कार्यक्रम समन्वयक रविंद्र पवळ, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, एएनएम, आशा सेविका परिश्रम घेत आहेत.
काय आहे योजनेचे स्वरूप
पहिल्यांदा गर्भवती राहिलेल्या मातेला या योजनेचा लाभ दिला जातो. तिने आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या नियमांच्या आधीन राहून आशा सेविकांकडे वेळच्यावेळी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तीन टप्प्यात या मातेला ५ हजार रुपयांचे अनुदान मिळते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्यामुळेच राज्यात अव्वल राहिलोत. यापुढेही आमचा अव्वल क्रमांक कायम टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करू. हे यश आमच्या टिमचे आहे.
- डॉ.आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड