खाजगी डॉक्टरांच्या दातृत्वामुळे सुरक्षित मातृत्व अभियानात बीड ठरणार ‘मॉडेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:13 AM2017-11-11T00:13:25+5:302017-11-11T00:13:32+5:30
स्त्रीभ्रूणहत्येमुळे राज्यात कुप्रसिद्ध झालेल्या बीड जिल्ह्यात खाजगी डॉक्टरांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यशाकडे अग्रेसर असून, ते राज्यात एक मॉडेल ठरू पाहत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्त्रीभ्रूणहत्येमुळे राज्यात कुप्रसिद्ध झालेल्या बीड जिल्ह्यात खाजगी डॉक्टरांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यशाकडे अग्रेसर असून, ते राज्यात एक मॉडेल ठरू पाहत आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान अधिक गतिमान करण्यासाठी बीड जिल्हा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. गुरुवारी जिल्ह्यातील जिल्हा, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय या १४ अर्बन संस्थांसह ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर मातांची तपासणी करून उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळेस सर्व मातांची तपासणी ही स्त्रीरोगतज्ज्ञांकडून पहिल्यांदाच करण्यात आली. पूर्वी संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व इतर डॉक्टर करीत असत; परंतु आतापासून स्त्रीरोगतज्ज्ञच गर्भवतींची तपासणी करीत आहेत. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला हा उपक्रम राबविला जात आहे.
पहिल्याच दिवशी हा उपक्रम १०० टक्के यशस्वी झाला. यापुढेही असेच कार्य सुरू ठेवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कदम, अतिरक्त जिल्हा शल्यचिकित्सक बाह्य डॉ. सतिश हरीदास, डॉ. संजय पाटील आदी डॉक्टर, अधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत.