बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणाची औरंगाबादेत पुनरावृत्ती; महिलेची प्रकृती गंभीर, डॉक्टर फरार
By योगेश पायघन | Published: February 5, 2023 12:50 AM2023-02-05T00:50:42+5:302023-02-05T00:51:16+5:30
चितेगाव येथील खाजगी रुग्णालयावर छापा, २ डाॅक्टर फरार, मध्यरात्रीपर्यंत चौकशी सुरू
औरंगाबाद : बीडमध्ये गाजलेल्या अवैध गर्भपाताची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती झाल्याची घटना शनिवारी रात्री समोर आली. चितेगाव येथील खाजगी रुग्णालयात अवैधरीत्या गर्भपात झाल्याचे उघडकीस आले. या रुग्णालयात गर्भपात करताना प्रकृती गंभीर झालेली महिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिस आणि आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाने या रुग्णालयात रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा मारला. त्यावेळी येथील २ डाॅक्टर फरार झाले. रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू झाली.
याविषयी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देसगाव पाडवी (जि. बुलडाणा) येथील २७ वर्षीय महिला गुरुवारी घाटी रुग्णालयात दाखल झाली. पोटात दुखत असल्याची महिलेची तक्रार होती. स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या डाॅक्टरांनी तपासले असता त्या महिलेचा गर्भ हा गर्भपिशवीच्या बाहेर आला होता. शिवाय गर्भपिशवीही फाटलेली होती. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करून या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांत नोंद करण्यात आली. यानंतर शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकासह बिडकीन पोलिसांनी चितेगाव येथील ‘औरंगाबाद स्त्री रुग्णालय’ नावाच्या या दवाखान्यावर छापा टाकला. तेव्हा रुग्णालयातील डाॅक्टर पळून गेले होते. रुग्णालयात निर्बंध असलेली औषधी आणि गर्भपातासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या प्रकरणी उशिरापर्यंत कारवाई व चौकशी सुरू होती.
बोगस डाॅक्टर असल्याचे पथकाचे निरीक्षण
या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांनी महिलेच्या प्रकृतीचा आढावा घेतला. छापा टाकलेल्या पीसीपीएनडीटी पथकात जिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डाॅ. कमलाकर मुदखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष कडले, अॅड. रश्मी शिंदे यांचा समावेश होता. पथकाने महिलेचा गर्भापात करणारे डाॅक्टर बोगस असावेत असे प्राथमिक निरीक्षण नोंदवले.
महिलेवर आयसीयुत उपचार सुरू
महिलेची प्रकृती गंभीर असून महिलेवर घाटी रुग्णालयात आयसीयुत डाॅ. श्रीनिवास गडप्पा यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहेत. फरार असलेले डाॅक्टर पती पत्नी असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. मात्र, याला दुजोरा मिळाला नाही. तर बिडकीन पोलिस ठाण्याचे एपीआय संतोष माने यांनी ही वैद्यकीय विभागाची कारवाई असून अजून सुरू असल्याचे शनिवारी रात्री साडे अकरा वाजता सांगितले.
व्याप्ती वाढण्याची शक्यता...
अर्धवट गर्भपाताची अनेक प्रकरणे गेल्या काही महिन्यांत घाटी रुग्णालयात दाखल झाले. मात्र, नेमका गर्भपात कोठे केला हे समोर येत नव्हते. यावेळी रुग्णालयाचे नाव समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.