विद्यापीठात घनवन प्रकल्पातील वृक्षरोपणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:04 AM2021-07-08T04:04:57+5:302021-07-08T04:04:57+5:30
--- औरंगाबाद : कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडांच्या लागवडीचा मियावाकी घनवन प्रकल्प डॉ.बाबासाहेब ...
---
औरंगाबाद : कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडांच्या लागवडीचा मियावाकी घनवन प्रकल्प डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात साकारत आहे. अवघ्या अर्धा एकर जागेत सहा हजार झाडांच्या लागवडीला बुधवारी सुरुवात झाली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या प्रकल्पाला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते वृक्षारोपणा करून बुधवारी सुरुवात झाली. ‘ईकोसत्त्व इन्व्हार्यमेंट सोल्यूशन्स’ या संस्थेचे सहकार्य यासाठी लाभले आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, रासेयो संचालक डॉ. टी. आर. पाटील, नताशा झरीन, मिलिंद केळकर, आम्रपाली त्रिभुवन, सिध्दार्थ इंगळे, प्रेम राजपूत आदींची उपस्थिती होती. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठ विश्रामगृह परिसरातील पीएच. डी. वसतिगृहाच्या जवळची अर्धा एकर जागा वापरण्यात येणार आहे. ६० विविध प्रकारची सहा हजार झाडे अवघ्या अर्धा एकर जागेत लावण्यात येणार आहेत. येत्या दिवाळीपर्यंत हे वृक्षरोपण पूर्ण करण्यात येईल. विद्यापीठ परिसर ‘ऑक्सिजन हब‘ म्हणून ओळखले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे ‘सिमेंट‘चे जंगल निर्माण होत आहे. अशा काळात विद्यापीठ परिसर अधिकाधिक हिरवा व नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे कुलगुरू डॉ. येवले यावेळी म्हणाले.