'सुरुवात मायबोलीत...'; मुक्तीसंग्राम दिनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मराठीत दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 01:18 PM2023-09-18T13:18:15+5:302023-09-18T13:20:54+5:30
न्यायायाधीश, वकिलांनी समन्वयाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा; सरन्यायाधीश डाॅ. धनंजय चंद्रचूड यांचे आग्रही प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : भाषणाची सुरुवात मायबोलीत करतो असे म्हणत सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डाॅ. धनंजय चंद्रचूड यांनी मराठवाड्यातील संत, स्वातंत्र्यसैनिक आणि येथील समृद्धीचा उल्ल्खेख करत अस्खलित मराठीत मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे हा न्याय व्यवस्थेचा मूळ उद्देश आहे. घटनाकारांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सद्सद विवेक बुद्धीला अनुसरून, न्यायाधीश आणि वकिलांनी याेग्य समन्वयाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आग्रही प्रतिपादन सरन्यायाधीश डाॅ. चंद्रचूड यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त उच्च न्यायालय प्रशानाच्या वतीने एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात आयाेजित कार्यक्रमात सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय न्या. अभय ओक आणि न्या. दीपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला, औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठतम न्यायमूर्ती रवींद्र घुगे, ॲडव्हाेकेट जनरल डाॅ. बिरेंद्र सराफ, बार काैन्सिलचे उपाध्यक्ष उदय वारुंजीकर, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष नरसिंग जाधव व सचिव राधाकृष्ण इंगाेले यांची मंचावर उपस्थिती हाेती.
समृद्धी सचिन कुलकर्णी हिने स्वागत गीत गायले. ॲड. चैतन्य धारूरकर यांनी सूत्रसंचालन केले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी आभार मानले. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील, राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती एस. एस. शिंदे, औरंगाबाद खंडपीठ, नागपूर आणि गोवा खंडपीठातील न्यायमूर्ती, ज्येष्ठ विधिज्ञ, वकील आणि विधि शाखेचे विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
भाषणाची सुरुवात केली मराठीत
‘न्याय व्यवस्था बळकट करण्यासाठी वकील आणि न्यायधीशांमध्ये समन्वय वाढविणे’ या विषयाची मांडणी करताना प्रारंभी न्या. चंद्रचूड यांनी मायबोलीत भाषणाची सुरुवात केली. मराठवाड्यातील संत परंपरेचा, ज्याेतिर्लिंगाचा उल्लेख करीत मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यवीरांना व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या त्यागाच्या निष्ठेचे फळ आपण आज स्वातंत्र्याच्या रूपाने चाखताे आहोत, असे ते म्हणाले.
न्यायव्यवस्थेने तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज
ते म्हणाले की, न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारा प्रत्येक घटक न्यायव्यवस्थेचा अविभाज्य अंग आहे. वकील आणि न्यायमूर्तींनी परस्परांचा सन्मान करावा. काेणतेही काम करताना ते सद्सदविवेक बुद्धीला स्मरून केले तर उद्दिष्टपूर्ती हाेते. हाच नियम न्यायव्यवस्थेलाही लागू पडताे. न्यायव्यवस्थेने तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. सर्वाेच्च न्यायालयाचे सुमारे ३६ हजार निवाडे ‘ ईएसईआर’प्रणालीवर मराठीसह देशाच्या विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ वकिलांनी घ्यावा. तसेच ई-फायलिंग, ई-सेवा केंद्र आणि विधि विद्यापीठे ही विधि शिक्षणाची आवश्यक अंग आहेत.
सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी मायबोली मराठीत केली भाषणाची सुरुवात; मुक्तीसंग्राम दिनाच्या दिल्या शुभेच्छा
( व्हिडिओ: सुमित डोळे @sumitdd ) #MarathwadaMuktiSangram#ChhatrapatiSambhajinagarpic.twitter.com/KTwlHkmUB7— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 18, 2023
विश्वासार्हता हा न्याय व्यवस्थेचा आत्मा
तरुण वकील व्यवसायात येत आहे. त्यांना वरिष्ठ वकिलांनी वेळाेवेळी मार्गदर्शन करावे. विधि विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे कार्य करून तरुण वकिलांना प्रशिक्षित करावे. न्याय व्यवस्थेत जवळपास ५० टक्के महिला वकील आहेत. त्यांना आवश्यक त्या साेयी-सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. तरुण वकिलांचा दृष्टिकाेन व्यापक, वैविध्यपूर्ण व सर्वसमावेशक असावा. काळा काेट व गाऊन प्रत्येकवेळी तुम्हाला तुमच्या कर्तव्याची आठवण करून देताे. विश्वासार्हता हा न्याय व्यवस्थेचा आत्मा आहे याचे स्मरण ठेवा, असे ते शेवटी म्हणाले.